Friday, October 30, 2026

Western Railway Megablock: वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रीकालीन ब्लॉक; वाचा अपडेट...

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर दिवसकालीन मेगाब्लॉक न घेता, रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर दिवसकालीन मेगाब्लॉक न घेता, रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शनिवार आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉकचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो जर तुम्ही शनिवारी रात्री उशिरा प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते भायंदर स्थानकादरम्यान, हा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री उशिरा जम्बोब्लॉक घेतला असणार असल्यामुळे रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर ब्लॉत घेण्यात येणार नाही.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी मध्यरात्री रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीच्या कामासाठी, शनिवार- रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2026 च्या रात्री बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान 'जम्बो ब्लॉक' घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून प्रवाशांना ह्या जम्बो ब्लॉकची माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक 31 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री उशिरा 11.30 वाजल्यापासून 1 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटे 04.30 वाजेपर्यंत 'अप' आणि 'डाउन' अशा दोन्हीही जलद मार्गांवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगाब्लॉकच्या काळामध्ये, विरार- वसई रोड आणि बोरीवली दरम्यान धावणाऱ्या सर्व जलद उपनगरीय (suburban) लोकल धिम्या मार्गावरून (slow lines) चालवण्यात येणार आहेत. परिणामी, या काळात पश्चिम रेल्वेकडून काही 'अप' आणि 'डाउन' उपनगरीय लोकलच्या फेऱ्या सुद्धा रद्द करण्यात येणार आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी उपनगरीय विभागातील स्टेशन मास्तरच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध असेल. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेतल्यानंतर, पश्चिम रेल्वे मार्गिकेवर रविवारी, 1 नोव्हेंबर 2026 रोजी दिवसा कोणताही देखभाल ब्लॉक (Maintenance Block) घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वे मार्गिकेवर घेतलेल्या रात्रकालीन ब्लॉकच्या आधारेच प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रवाशांना केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >