नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी कुशावर्त तीर्थ येथे हा भव्य धार्मिक सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला दक्षिण शृंगेरी शारदा पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधी आणि दहा आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. या धर्मध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभाची नांदी देशभरासह जगभरात पोहोचणार आहे.
धर्मध्वजाचे धार्मिक महत्त्व काय ?
धर्मध्वजारोहणासाठी पितळेपासून तयार करण्यात आलेल्या ध्वजस्तंभाची प्रतिष्ठापना यापूर्वीच करण्यात आली आहे. या स्तंभावर आकर्षक धर्मध्वज विराजमान होणार आहे. ध्वजावर विविध देवता, धार्मिक प्रतीके आणि शुभचिन्हांचा समावेश करण्यात आला असून, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ओंकार, स्वस्तिक आणि दशदिशा यांसारखी प्रतीके आहेत. सूर्य आणि चंद्र ही अमृतकुंभाच्या रक्षणाशी संबंधित प्रतीके मानली जातात. बृहस्पतीचा सिंह राशीतील प्रवेश हा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालचक्राशी जोडला गेला आहे. सिंह हे सिंह राशीचे प्रतीक असून, त्याचा संबंध गुरूच्या वाहनाशीही जोडला जातो.
मगर हे गोदावरी नदीशी संबंधित प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या तीर्थपरंपरेचा संदर्भ त्यातून व्यक्त होतो. ओंकार हे पवित्र आध्यात्मिक चिन्ह, तर स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. ध्वजावरील इतर चिन्हे वैश्विक चेतना, माया, सर्जनशक्ती आणि दशदिशांची व्यापकता दर्शवतात. ध्वजाच्या शेवटी असलेल्या १२ घंट्यांचाही राशी आणि बृहस्पतीच्या भ्रमणचक्राशी संबंध असल्याचे सांगितले जाते.
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबरपासून या ...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
या धर्मध्वजारोहण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनीता पवार, मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, उदय सामंत, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.याशिवाय आमदार सुहास कांदे, आमदार हिरामण खोलकर, खासदार राजाभाऊ बाजे यांच्यासह दहा आखाड्यांचे प्रतिनिधी, साधू-महंत आणि विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
विविध संस्थांकडून सोहळ्याचे नियोजन
त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर नगर परिषद, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, प्रमुख आखाडे आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे.पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेते, नगर परिषद अध्यक्षा त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सोनवणे यांच्यासह विविध आखाड्यांचे पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
पोलीस बंदोबस्तासह धार्मिक विधींची तयारी पूर्णत्वाकडे
धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहनांची वाहतूक व्यवस्था, कुशावर्त तीर्थ परिसर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांनी रंगीत तालीमही घेतली आहे.दुसरीकडे, पुरोहित संघाकडून धर्मध्वजारोहणासाठी आवश्यक मंत्रविधान आणि धार्मिक विधींची तयारी सुरू आहे. नगर परिषदेकडूनही सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
धर्मध्वजारोहणाच्या या भव्य सोहळ्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपात अधिक गती मिळणार आहे.