नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबरपासून या सोहळ्याला प्रारंभ होत असून, तीन दिवस विविध धार्मिक विधी, ध्वजदंड प्रतिष्ठापना आणि भव्य नगरप्रदक्षिणा पार पडणार आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंड येथे मुख्य धर्मध्वजारोहण होणार आहे.
तीन दिवस धार्मिक विधींचे आयोजन
शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता ध्वजदंड प्रतिष्ठापना आणि नगरप्रदक्षिणेने कार्यक्रमाची सुरुवात. वेदमूर्ती भालचंद्र एकनाथशास्त्री शौचे गुरुजी आणि यज्ञाचार्य पंडित वैभव दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी पार पडतील. पहिल्या दिवशी तीर्थपूजन, संकल्प, गणेशपूजन, नवग्रह रुद्र स्थापना, स्नपन विधान, विविध हवन, धान्याधिवास आणि शय्याधिवास असे विधी होतील. सायंकाळी श्री गोदावरीची विशेष प्रार्थना करण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी मुख्य धर्मध्वजारोहण
शनिवारी सकाळपासून स्थापित देवतांचे पूजन आणि धार्मिक कार्यक्रम सुरू होतील. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेशपूजन, पंचार्घ्य समर्पण आणि तीर्थपूजन होईल.यानंतर दुपारी १२.०२ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य सिंहस्थ महाध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी गोदाआरती आणि विशेष प्रार्थनेचेही आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी प्रतिष्ठापना हवन आणि पूजनाने दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल.
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदावरी नदीचे कोरडे पात्र पुन्हा प्रवाही झाले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ...
रविवारी पूर्णाहुतीने सोहळ्याची सांगता
रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रातःपूजन, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभृत स्नान, गोदाआरती, प्रार्थना आणि कर्मसमर्पण असे धार्मिक विधी पार पडतील. या कार्यक्रमानंतर तीन दिवसीय महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होईल.या सोहळ्यास नागरिक, भाविक, साधू-संत आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
एक लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे. रामकुंडावरील ध्वजारोहण सोहळा आणि सायंकाळच्या गोदाआरतीसाठी सुमारे एक लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यंदाच्या कुंभमेळ्यात गर्दीचे सर्व विक्रम मोडले जातील, असा विश्वास व्यक्त केला. ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण होणार आहे.
साधूग्रामचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल साधू-महंतांकडून व्यक्त होत असलेल्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना, कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण केली जातील, असे महाजन यांनी स्पष्ट केले. ध्वजारोहणाच्या दिवशी मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक, सुरक्षा आणि अन्य सुविधांचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या महाध्वजारोहण सोहळ्याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.