नाशिक : प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या गोदातीरावर आज सिंहस्थ कुंभपर्व २०२६-२०२८ चा अधिकृत आणि मंगलमय शुभारंभ झाला. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मंत्रोच्चार आणि लाखो भाविकांच्या जयघोषात नाशिकच्या पवित्र रामकुंडावर हा भव्य धर्मध्वजारोहण सोहळा दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर अत्यंत उत्साहात संपन्न झाला. शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी उभारण्यात आलेल्या या धर्मध्वजाने कुंभपर्वाचा आरंभ झाला असून, २४ जुलै २०२८ पर्यंत हा आध्यात्मिक महासोहळा चालणार आहे. या पर्वातील पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर धार्मिक विधींना प्रारंभ!
सकाळी राष्ट्रपतींचे गोदातीरावर आगमन झाल्यानंतर त्यांनी पवित्र रामकुंडावर विधिवत गंगापूजन आणि अर्घ्यदान करून धार्मिक विधींना प्रारंभ केला. यावेळी वेदमंत्रांच्या जयघोषात त्यांनी धर्मध्वजाची शास्त्रोक्त पूजा केली. त्यानंतर दुपारी ठरलेल्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपतींच्या हस्ते धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला.
या ऐतिहासिक सोहळ्यास दोन्ही उपमुख्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे यांच्यासह अनेक अतिमहत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त शेखर सिंह, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आणि १३ आखाड्यांचे प्रमुख साधू-महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर : गोदावरीच्या उगमस्थानी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा ...
विविध उपक्रमांचे लोकार्पण आणि आज संध्याकाळचे कार्यक्रम :
मुख्य सोहळ्यात २५१ वादकांच्या शंखनादाने अवघा परिसर दुमदुमणार आहे, तर २५ ऑक्टोबरच्या ५०१ शंखवादकांच्या विश्वविक्रमाचे अधिकृत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रमाणपत्र याच मंचावर सुपूर्द केले जाईल. यासोबतच कुंभ गान, विशेष टपाल तिकीट, कॉफी टेबल बुक आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत पोर्टलचे लोकार्पण आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, सर्वांचे लक्ष लागले आहे ते आज संध्याकाळी याच रामकुंडावर होणाऱ्या भव्य गंगा-गोदावरी महाआरतीकडे. हजारो आदिवासी बांधवांच्या सहभागाने ही महाआरती सायंकाळी ६:३० ते ७ च्या दरम्यान संपन्न होणार असून, तब्बल एक लाख भाविक गोदातीरावर दाखल होण्याचा अंदाज आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने दुपारी ४:३० पूर्वीच भाविकांना जागा घेण्याचे आवाहन केले आहे.