मुंबई (सचिन धानजी) : रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिका रुग्णालयांचे ऑडीट करण्यात आले असून त्यामध्ये नायर रुग्णालयांच्या सातही इमारतींमध्ये अग्निसुरक्षेबाबतच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे या सातही इमारतींमध्य प्रामुख्याने मॅन्युअल फायर अलार्म, कंट्रोल पॅनेल, बूस्टर पप, स्प्रिंकलर प्रणाली, स्मोक डिटेक्टर लावण्यात येणार आहेत. थेट रुग्णांच्या जीविताशी निगडीत असल्याने अग्निसूरक्षा संबंधितची ही कामे तातडीने घेण्यात आली आहेत. यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात येत असून पुढील दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण करून खऱ्या अर्थाने नायर रुग्णालय फायरप्रुफ बनले जाणार आहे.
सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये आगीच्या दुर्घटना घडल्या असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध महानगरपालिका रुग्णालयाची तपासणी केली. त्यात, बहुतांशी महानगरपालिका रुग्णालयामध्ये अग्निशमन यंत्रणा सुसज्ज नाहीत व काही ठिकाणी अग्निशमन यंत्रणा कार्यरत नाहीत, ही बाब समोर आली. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका रुग्णालयांशी संबंधित अग्निशमन यंत्रणाची कामे सुलभरित्या पार पाडण्यासाठी उप-आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या आधीच्या बैठकांदरम्यान महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी टप्पा निहाय आराखडा तयार करण्यात आला. यात टप्प्या टप्प्याने कामांची पूर्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने नायर रुग्णालय येथे फायर ऑडिट करुन त्यांचा अहवाल तयार केला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील झोपडपट्टी परिसर, अरुंद गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणे तसेच कचरापेट्यांच्या परिसरात साचलेला कचरा जलदगतीने उचलून त्याची ...
नायर रुग्णालयाच्या आवारात एकूण 7 इमारती असून त्यांच्या अहवालानुसार सातही इमारतीमधील अग्निसुरक्षेबाबतच्या त्रुटीची पुर्तता तसेच पालन करण्याबाबत कळविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मॅन्युअल फायर अलार्म, कंट्रोल पॅनेल, बूस्टर पप, स्प्रिंकलर प्रणाली, स्मोक डिटेक्टर लावणे आवश्यक असल्याचे सूचित केले. त्यानुसार महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने नायर रुग्णालयात अग्निसुरक्षा उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा मागवली आहे. यामध्ये यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली असून यावर सुमारे 18 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
नायर रुग्णालय हे महानगरपालिकेचे अत्यंत महत्वाचे असून दररोज वॉर्ड, आयसीयू, ऑपरेशन थिएटर, अपघात विभाग इत्यादी मार्फत अविरतपणे रुग्णांना सेवा दिली जाते. हे विभाग 24 तास कार्यरत असतात, त्यामुळे रुग्ण सेवेची संबंधित विविध यंत्रे व संयंत्रे व उच्च विद्युत दाबावर चालणा-या यंत्राचा सतत वापर सुरु असतात. तसेच दैनंदिन स्तरावर या रुग्णालयामध्ये मोठ्याप्रमाणात रुग्णाची ये-जा सुरु असते. तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता रुग्णालयातील कर्मचा-याची उपस्थिती असते. या व्यतिरिक्त या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचा वावर असतो. ही कामे अग्निसूरक्षा संबंधित असल्याने थेट रुग्णांच्या जीविताशी निगडीत आहेत. त्यानुसार या रुग्णालयात फायर ऑडिट रिपोर्टच्या अहवालानुसार रुग्णालयामध्ये अग्निसुरक्षा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही संबंधित कंपनी पुढील पाच वर्षे देखभाल करणार आहे.