नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पथकाने कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. रविवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देत पथकाने प्रशासकीय नियोजन, विविध विभागांमधील समन्वय आणि कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी सुरू असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली.
या पथकामध्ये आर्थिक सल्लागार डॉ. अनुराधा गुरु, डॉ. रोझ मेरी के. अब्राहम आणि संचालक कोकिला जयराम यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी झाले होते. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी पथकाचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यानंतर प्राधिकरणाच्या कार्यालयात संवादात्मक बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. मोठ्या प्रमाणावरील भाविकांची संभाव्य उपस्थिती लक्षात घेऊन आवश्यक नागरी सुविधा, प्रशासकीय यंत्रणेची सज्जता, विविध शासकीय विभागांमधील समन्वय आणि शहराच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये आयोजित होणाऱ्या ‘सिंहस्थ कुंभमेळा’ सोहळ्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भव्य योजना ...
दरम्यान, नाशिकची आर्थिक क्षमता आणि विविध क्षेत्रांतील विकासाच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी भारत सरकारच्या पथकाचा हा व्यापक आर्थिक अभ्यास दौरा होता. या दौऱ्यांतर्गत कृषी, प्रगत उत्पादन उद्योग, जीवन विज्ञान तसेच उदयोन्मुख उद्योग क्षेत्रांतील संधींचा आढावा घेण्यासाठी विविध कृषी व औद्योगिक आस्थापनांना भेटी देण्यात आल्या.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून पथकाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनातील नागरी प्रशासनाची भूमिका आणि एवढ्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेची माहिती मिळाली.