Monday, November 2, 2026

Amit Shah : "राहुल बाबा, परदेशात फिरून निवडणुका नाही जिंकता येत; देशात येऊन घाम गाळावा लागतो!" अमित शाह यांची राहुल गांधींवर टीका

"काँग्रेस पक्ष सध्या स्वतः व्हेंटिलेटरवर आहे. व्हेंटिलेटरवर असलेला हा पक्ष पंतप्रधान मोदींसोबत मॅरेथॉन कशी काय पळू शकणार ? राहुल जी, मोदीजींना तर बाजूलाच ठेवा, आमचा तेलंगणा भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष जरी समोर उभा ठाकला, तरी तो तुमचा पराभव करण्यासाठी पुरेसा आहे," असा जोरदार टोला अमित शाह यांनी लगावला.

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी हैदराबादमध्ये भाजपच्या 'लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ' या भव्य पदयात्रेला संबोधित करताना काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. "काँग्रेस पक्ष सध्या स्वतः व्हेंटिलेटरवर आहे. व्हेंटिलेटरवर असलेला हा पक्ष पंतप्रधान मोदींसोबत मॅरेथॉन कशी काय पळू शकणार ? राहुल जी, मोदीजींना तर बाजूलाच ठेवा, आमचा तेलंगणा भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष जरी समोर उभा ठाकला, तरी तो तुमचा पराभव करण्यासाठी पुरेसा आहे," असा जोरदार टोला अमित शाह यांनी लगावला.

स्वामी विवेकानंद ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत भव्य मार्च

हैदराबादमधील प्रसिद्ध टँक बंड परिसरात स्वामी विवेकानंद आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या मार्गावर हा विशाल मोर्चा काढण्यात आला. या पदयात्रेच्या समारोपानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, त्यांनी चारमिनार परिसरातील ऐतिहासिक श्री भाग्यलक्ष्मी माता मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली आणि देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली. "जर त्या काळा d्यात सरदार पटेल यांनी निजामाला गुडघे टेकवायला लावले नसते, तर आजचा हैदराबाद भारताचा भाग कधीच बनू शकला नसता," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

'व्होट बचाओ' नाही, तर ती 'घुसखोर बचाओ' रॅली होती!

दिल्लीतील रामलीला मैदानावर विरोधी पक्षांनी घेतलेल्या महासभेवर निशाणा साधत शाह म्हणाले, "काल दिल्लीत राहुल गांधी यांनी एक रॅली काढली आणि तिला 'व्होट बचाओ' रॅली असे नाव दिले. पण ती कोणतीही मते वाचवणारी रॅली नव्हती, तर ती थेट 'घुसखोर बचाओ' (Save Infiltrators) मोहीम होती." मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, बोगस मतदानाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत.

"देशात ३ कोटी बोगस मतदार, ते सगळे बांगलादेशी घुसखोर"

मतदार याद्यांच्या शुद्धीकरणावर (SIR) अधिक बोलताना अमित शाह म्हणाले, "एकाच व्यक्तीची दोन-दोन ठिकाणी नावे असतील, तर त्यातील एक नाव रद्द व्हायला हवे की नको? राहुल बाबांच्या पोटात नेमके याच गोष्टीमुळे दुखत आहे. आज देशात तब्बल ३ कोटी एवढे बोगस मतदार आहेत, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. हे सर्वच्या सर्व बांगलादेशी घुसखोर आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष याच घुसखोरांना पाठीशी घालण्यासाठी एसआयआरला (SIR) कडाडून विरोध करत आहेत, कारण हीच मंडळी त्यांची मुख्य व्होट बँक आहे. पण मी आज स्पष्ट शब्दांत सांगतो, राहुल जी आणि रेवंत रेड्डी यांनी कितीही जोर लावला तरी भाजप एकाही घुसखोराला मतदार यादीत टिकू देणार नाही आणि प्रत्येक घुसखोराला हुडकून देशाबाहेर हाकलून लावेल."

ऐतिहासिक विजयांचे दाखले अन् काँग्रेसच्या आरोपांना उत्तर

भाजप केवळ मतदार याद्यांच्या बदलांमुळे (SIR) जिंकतो या राहुल गांधींच्या आरोपांचा अमित शाह यांनी तीव्र निषेध केला. भूतकाळातील निवडणुकांचे दाखले देत शाह म्हणाले, "२०१४ आणि २०१९ मध्ये जेव्हा मोदीजी जिंकले, तेव्हा कुठे SIR होते? जनतेच्या मतांमुळे मोदीजी जिंकले. २०२४ नंतर आम्ही महाराष्ट्रात ऐतिहासिक बहुमताने जिंकलो, हरियाणामध्ये मोठा विजय मिळवला, ३० वर्षांनंतर दिल्लीत विजय मिळवला, बिहारमध्ये जिंकलो आणि बंगालमध्ये तर 'दीदीं'चे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे."

संसदेत समोरासमोर चर्चेचे खुले आव्हान

विरोधक संसद चालू देत नसल्याचा आरोप करत शाह यांनी राहुल गांधींना थेट संसदेत चर्चेचे आव्हान दिले. "तुम्ही देशाला अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहात. मी हैदराबादच्या भूमीवरून तुम्हाला थेट आव्हान देतो की, आम्ही संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायला तयार आहोत. या आणि संसदेच्या पटलावर चर्चा करा. पण तुम्ही चर्चेत सहभागी होणार नाही, कारण काँग्रेसला केवळ गदारोळ घालूनच चर्चेत राहायचे आहे," असे शाह म्हणाले.

"मॉक पार्लमेंटमध्ये तरी पंतप्रधान बना, सोनियाजींना शांती मिळेल"

काँग्रेसने आयोजित केलेल्या 'मॉक पार्लमेंट' (चावडी संसद) वर उपरोधिक टीका करताना अमित शाह म्हणाले, "राहुल जी, तुम्ही दोन दिवसांपूर्वी मॉक पार्लमेंट घेतली. मला विचारले असते तर मी सल्ला दिला असता की विरोध पक्षनेते राहण्याऐवजी त्या मॉक पार्लमेंटमध्ये तरी किमान एकदा स्वतःला पंतप्रधान घोषित करून टाका. कारण खऱ्या संसदेत तर तुम्ही कधीच पंतप्रधान बनू शकणार नाही! किमान मॉक पार्लमेंटमध्ये तरी तुम्ही पंतप्रधान झालात तर सोनियाजींच्या मनाला थोडे समाधान आणि शांती मिळेल." शेवटी, "परदेशात जाऊन आणि काही महिने बाहेर फिरून निवडणुका जिंकता येत नाहीत. देशात राहून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी घाम गाळावा लागतो," असा सल्लाही त्यांनी राहुल गांधींना दिला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >