Monday, November 2, 2026

सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावले; नाराजीची चाचपणी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी मंगळवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. तब्बल चार महिन्यांनंतर पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक होत असून, त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन पक्षातील निर्णयप्रक्रियेत आपल्याला डावलले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबतही या नेत्यांनी शाह यांच्याकडे तक्रार केली. पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या आणि निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची त्यांची तक्रार असल्याचे सांगितले जाते. या भेटीत राज्याचे अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, या मागणीवरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते भाजपकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याचा कार्यभार सांभाळत आहेत. हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे यावे, अशी पक्षातील नेत्यांची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत अर्थ खात्याचा मुद्दा उपस्थित झाल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. पक्षातील नाराजी, निर्णयप्रक्रिया, संघटनात्मक बाबी आणि आगामी राजकीय भूमिका यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, बैठकीचा अजेंडा किंवा संभाव्य निर्णयांबाबत पक्षाकडून तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >