
मुंबई: दिल्ली येथे 'इंडिया' आघाडीने काढलेल्या रॅलीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांना साधे भाषण करण्याची संधीही देण्यात आली नाही. राहुल गांधी यांचे महाराष्ट्राबद्दलचे धोरण सातत्याने दुजाभावाचे राहिले असून, या रॅलीमध्येही महाराष्ट्राबद्दलचा तोच आकस दिसून आला. अशा राहुल गांधींची गुलामी आणि चाकरी उबाठा गट किती वर्षे करणार आहे, असा सणसणीत सवाल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी उपस्थित केला. ते भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
'इंडिया' आघाडीची रॅली पूर्णपणे फ्लॉप
राहुल गांधींच्या या रॅलीची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, असे नमूद करत नवनाथ बन म्हणाले की, रामलीला मैदानाची क्षमता 50 हजारांच्या आसपास असताना, 20 पक्षांना एकत्र करूनही त्यांना 22 हजार लोकही जमवता आले नाहीत. यामुळे त्यांची कालची रॅली पूर्णपणे फ्लॉप ठरली. हीच त्यांची खरी क्षमता आणि शक्ती आहे. संजय राऊत यांना भिंगाचा चष्मा घालून जर ही गर्दी 10 ते 15 लाख वाटत असेल, तर त्यांना मनापासून शुभेच्छा, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, काँग्रेस नेत्यांनी एआय जनरेटेड फोटो सोशल मीडियावर टाकून रॅलीत कृत्रिम गर्दी दाखवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला. अशा बनावट फोटोंमधून गर्दी दाखवता येईल, पण जनतेच्या हृदयात कधीच स्थान निर्माण करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हैदराबाद : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाकडून देशातील संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचे व राज्यात अराजकता पसरवण्याचे कारस्थान ...
लोकशाही मार्गाने भेदतंत्राला चोख प्रत्युत्तर
राहुल गांधी यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या भेदतंत्राला उत्तर म्हणून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने विरोध करत आहोत, असे सांगत नवनाथ बन यांनी ठाण्यातील रॅलीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, काल ठाण्यात देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. तुम्ही जे चुकीचे दाखवत आहात, त्याला आमचा लोकशाही मार्गाने विरोध सुरूच राहील. आम्हाला देशात तुमच्यासारखी अराजकता पसरवायची नाही किंवा बांगलादेश व नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संजय राऊत आणि राहुल गांधींच्या जामीनावरून घणाघात
ज्या सरकारचे गृहमंत्री आणि संजय राऊत स्वतः तुरुंगवास भोगून आले आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोललेलेच बरे, अशा शब्दांत बन यांनी हल्लाबोल केला. संजय राऊत स्वतः जामिनावर बाहेर आहेत आणि राहुल गांधी सुद्धा 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. विशेष म्हणजे, जेव्हा जेव्हा नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी असते, त्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधी मोर्चा काढतात. यापूर्वी झालेल्या मोर्चानंतरही असेच घडले होते आणि आजही त्याच प्रकरणाची सुनावणी असताना काल हा मोर्चा काढण्यात आला, असा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या विरोधकांना धारेवर धरत नवनाथ बन म्हणाले की, मोदींना तुरुंगात टाकण्याची धमक तुमच्यात नाही. कारण मोदींनी स्वतःचे घर बांधण्यासाठी कधीही भ्रष्टाचार केला नाही. मोदींनी पत्रा चाळ किंवा बीडीडी चाळीत घोटाळा करून घरांच्या किंमती वाढवलेल्या नाहीत किंवा कोणालाही 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिलेले नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.




