
मुंबई, (विशेष प्रतिनिधी)-: मुंबईतील प्रदूषणाची स्थिती पाहता दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने काही सेलिब्रिटींमार्फत जनजागृतीपर संदेश देणारे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित केले आहेत. यामध्ये चित्रपट अभिनेत्री आणि पर्यावरणप्रेमी दिया मिर्झा यांनीही फटाके कमी फोडण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. यावरून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी, याला हिंदुतावच्या मुद्द्यावरून विरोध दर्शवल्यानंतर प्रशासनाने हा व्हिडिओ हटवला. मात्र, या प्रसारीत केलेल्या व्हिडीओबाबत महापौर रितू तावडे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत "दिया मिर्झा हिंदुविरोधी, देशद्रोही असून त्यांनी आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी ते शिकवू नये", अशा शब्दांत त्यांचा आणि प्रशासनाचा समाचार घेतला.
महापौर रितू तावडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला असून याप्रकरणी आपण महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना पत्र पाठवणार असून हिंदुत्वविरोधी दिया मिर्झा यांचा व्हिडिओ महापालिका प्रशासनाने का पोस्ट केला, असा सवाल करून जाब विचारणार असून त्याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे. दिया मिर्झाला काळया यादीत टाकावे, अशी मागणी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
दिया मिर्झा या हिंदू विरोधी, देशद्रोही असून त्यांची भूमिका पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेली नाही. त्या नेहमीच हिंदू सणांना लक्ष्य करून त्याविरोधात भूमिका घेतात, असा गंभीर आरोप महापौरांनी यावेळी केला.तसेच, 'आम्ही 'फटाके वाजवावेत किंवा वाजवू नयेत, हे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही दिवाळी कशी साजरी करावी, हे दियाने आम्हाला सांगण्याची गरज नाही, वास्तविक, दिया मिर्झा यांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाच्या दृष्टीने मांडलेल्या मुद्द्यांना नेहमीच विरोध केला आहे, असे आरोपही महापौरांनी यावेळी केले. मात्र हिंदुत्वाच्या विचारांशी आपली बांधिलकी कायम असून महायुती असेपर्यंत या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
महापालिकेने स्वतः अनेक नामांकित व्यक्तींना आपल्या पर्यावरण जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेतले होते. या मोहिमेद्वारे नागरिकांना जबाबदारीने दिवाळी साजरी करण्याचे तसेच वायू आणि ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दिया मिर्झा यांचा संदेशही पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्य यांच्याशी संबंधित होता. अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्त्या दिया मिर्झा यांचा व्हिडिओ मुंबई महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून वाद घालण्यापेक्षा मुंबईतील ढासळलेल्या पर्यावरणाबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आझमी यांनी केली आहे.
महापालिका आपले ट्विट बंद करणार असेल….
अमित साटम हे नेमके कोण आहेत ? त्यांचा महापालिकेच्या कारभारात एवढा वावर का आहे? असे सवाल उपस्थित करीत किशोरी पेडणेकर यांनी, याप्रकरणी महापालिकेने उत्तर दिले पाहिजे. अमित साटमसारख्या आमदाराला घाबरुन जर महापालिका आपले ट्विट बंद करणार असेल, तर महापालिकेला टाळेच मारलेले बरे ! अशी खोचक टीकाही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी केली
व्हिडीओ डिलीट करण्याचे कारण द्यावे
दिया मिर्झा प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी सावध पवित्रा घेतला. दिया मिर्झा यांचा व्हिडीओ डिलीट कोणत्या कारणांनी झालाय याबद्दल माहिती मिळायला पाहिजे. तसेच, महापौर रितू तावडे आणि उप महापौर संजय घाडी यांनी याप्रकरणी बैठक घेऊन माहिती घ्यावी. तसेच, पालिकेनेही स्पष्टीकरण द्यावे, अशी प्रतिक्रिया अमेय घोले यांनी दिली आहे.
महापालिकेने तो व्हिडीओ रिपोस्ट करावा
सिने कलाकार माधुरी दिक्षित, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, सिने कलाकार दिया मिर्झा यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने दिवाळी आनंदाने साजरी करा, फटाके कमी फोडा, असे आवाहन केले, यात गैर काही नाही. भाजप नेते अमित साटम यांनी ट्विट करून, 'शहाणपण शिकवू नका ' असे म्हटले आहे. मात्र हा सण सर्वांचा आहे, चांगल्या गोष्टीसाठी आवाहन केले तर तेढ निर्माण करू नये, असे वाटते. तसेच, महापालिकेने 'जो ' व्हिडिओ डिलीट केला आहे तो पुन्हा रिपोस्ट करायला हवा आहे,असे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले.






