Monday, November 2, 2026

BMC Sewerage Network : मुंबईत मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी १२ सल्लगारांचे पॅनेल

या १२ सल्लागारांच्या माध्यमातून मलनि:सारण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी) 

मुंबई महापालिकेच्यावतीने मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे टाकण्याचा प्रयत्न केला जात असून यापुढे मलनि:सारण वाहिन्यांची कामे योग्यप्रकारे हाळण्यासाठी तसेच त्यांची संकल्प चित्रे बनवण्यासाठी सल्लागारांचे पॅनेल बनवण्यात आले आहे. या मलनि:सारण वाहिनी टाकण्याच्या या कामांसाठी तब्बल १२ सल्लागारांचे पॅनेल बनवण्यात आले. विशेष म्हणजे १५ सल्लागारांनी यामध्ये भाग घेतला होता आणि त्यातील तीन सल्लागार बाद झाल्याने आता अंतिम १२ कंपन्यांची यादी बनवण्यात आली आहे. या १२ सल्लागारांच्या माध्यमातून मलनि:सारण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना १०० टक्के मलनिःसारण वाहिनीचे जाळे पुरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने २०८०.२७९ कि.मी. मलनिःसारण वाहिनीचे जाळे टाकलेले आहे. विद्यमान मलनिःसारण वाहिनीचे जाळे संपूर्ण मुंबईच्या ८५.७४ टक्के क्षेत्र आणि ८१.२८ टक्के लोकसंख्येला सेवा देते. मलनिःसारण वाहिनी नसलेल्या भागात मलनिःसारण वाहिनी टाकणे व पुरविणे. तथापि, मुंबईची भिन्न भौगोलिक स्थिती, भूगर्भीय स्तरातील अनिश्चितता, म्हाडाच्या ले आऊटमधील विस्तीर्ण क्षेत्र, उपलब्ध तांत्रिक कर्मचारी आणि माहितीसह मलनिःसारण वाहिनीच्या जाळ्यांची रचना करणे आणि टाकणे कठीण आहे. काही वेळा सीआरझेड आणि वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या मालकीच्या जमिनी किंवा महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनींमध्ये मलनिःसारण वाहिनी टाकणे आवश्यक असते.

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मलनिःसारण प्रकल्प विभागात, विविध तलावांचे पुनरुज्जीवन, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील म्हाडा लेआऊट सुधारित मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे यासारख्या सल्लागार सेवा पुरविण्याच्या कामांसाठी सल्लागारांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एकूण १५ सल्लागार कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये महिमतुरा कंपनी आणि त्यानंतर एफ पी इंडिया प्रोजेक्ट कंपनी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्सेलटेक कन्सल्टंसी अँड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या तिन कंपन्या अपात्र ठरल्या. त्यामुळे बारा सल्लागारांची अंतिम यादी बनवण्यात आली आहे.

मुंबईतील कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी व मलजल प्रक्रिया केंद्राची संकल्प चित्रे बनविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याकरिता सल्लागाराची आवश्यकता असते. वारंवार निविदा मागवण्याचा वेळ वाचवण्यासाठी, सल्लागारांची नियुक्ती करण्याचे प्रस्ताविले आहे, जेणेकरुन स्वतंत्र निविदेची वाट न पाहता स्वीकृत सल्लागारांच्या यादीमधून कामाचे वाटप करता येईल. त्यामुळे वेळेची बचत आणि निविदेची कामे जलद गतीने होण्याकरिता सल्लागारांची नियुक्ती करणे करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही निवड तीन वर्षांकरता असेल,असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी या १२ संस्थांची बनवली यादी

टेक्नो लॅण्ड इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स

मे. अर्शिया कन्सल्टींग इंजिनिअर्स – काईट अलाईड सर्व्हिस (जेव्ही)

मे. एनजेएस इंजिनिअर्स इंडिया प्रा.लि.

मे. स्थापती डिझाइनर्स अँड कन्सल्टंटस् जिवानी कॉन्स्ट्रुमा (जेव्ही)

मे. यश इंजिनिअरिंग कन्सल्टंटस् प्रा.लि.

मे. वाटमोव्ह इंजिनिअरिंग प्रा.लि.

मे. व्हापकोस लिमिटेड

मे. अन्वया कन्स्ट्रक्शन कन्सल्टंसी प्रा.लि.

मे. प्रिमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंटस् -टेक्नोजेम कन्सल्टंटस् (जेव्ही)

मे. डिआरए कन्सल्टंटस् प्रा.लि.

मे. टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा. लि.

मे. यश इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एलएपी

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >