Tuesday, November 3, 2026

IND vs NZ : पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? गिलने केला खुलासा

पहिले चार फलंदाज निश्चित आहेत, परंतु ५ व्या आणि ६ व्या क्रमांकासाठी बदल केले जाऊ शकतात, असे शुभमन गिल ने सांगितले आहे.

IND vs NZ 1st ODI: भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका ४ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार ते भारतीय कर्णधार शुभमन गिलने सांगितले आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी, भारतीय कर्णधार शुभमन गिल याने माध्यमांशी संवाद साधत प्लेइंग इलेव्हनबद्दल संकेत दिले. याबद्दल बोलताना, पहिले चार फलंदाज निश्चित आहेत, परंतु ५ व्या आणि ६ व्या क्रमांकासाठी बदल केले जाऊ शकतात, असे शुभमन गिल ने सांगितले आहे.

शुभमन गिल काय म्हणाला?

पहिल्या वनडेत श्रेयस अय्यरला वगळले जाऊ शकते. श्रेयसच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. श्रेयस बॅक टू बॅक सामने खेळताना दिसत आहे, त्यामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामळे ऋतुराज गायकवाड पहिल्या सामन्यात खेळू शकतो असं गिलने सांगितले आहे. तसेच पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी अद्याप ठरलेले नाही. आमचे पहिले चार फलंदाज निश्चित आहेत आणि ते सर्व उजव्या हाताचे फलंदाज आहेत. त्यामुळे, जर डावखुऱ्या फलंदाजाची गरज असेल, तर अक्षर भाईला संघात संधी दिली जाऊ शकते आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार केएल भाईलाही संधी मिळू शकते.

त्याचप्रमाणे, दुखापतीमुळे हार्दिक पांड्याच्या प्रदीर्घ अनुपस्थितीने भारतीय एकदिवसीय संघाचे संतुलन बिघडले आहे आणि कर्णधार शुभमन गिलचा विश्वास आहे की, या अष्टपैलू खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाने संघाच्या सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या फलंदाजांची समस्या सुटेल. त्यामुळे संघात काही प्रमाणात लवचिकता पाहायला मिळणार आहे. जेव्हा हार्दिक भाई संघात परत येईल, तेव्हा ७ व्या आणि ८ व्या क्रमांकाची जागाही निश्चित होईल. तूर्तास विश्वचषकापूर्वी मी आमच्या फलंदाजी गटावर समाधानी आहे. तर हार्दिकबद्दल बोलताना, आमच्या अनेकदा चर्चा झाल्या. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि जगात असे खूप कमी खेळाडू आहेत. ज्यांच्याकडे त्याच्यासारखी क्षमता आहे. त्यामुळे तो काही देशांतर्गत सामने खेळेल आणि पुनरागमन करेल. भारत ‘अ’ संघाच्या सामन्याच्या शेवटच्या क्षणी त्याला किरकोळ दुखापत झाली हे दुर्दैवी आहे.

शुभमन गिलच्या या वक्तव्यामुळे २०२७ च्या विश्वचषकासाठी संघाच्या अंतिम ११ खेळाडूंबद्दल महत्त्वाचे संकेत मिळतात. सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या जागा निश्चित होतील, या गिलच्या विधानावरून असे सूचित होते की, सातव्या किंवा आठव्या क्रमांकाच्या जागा निश्चित होईपर्यंत भारतीय फलंदाजीची फळी पूर्णपणे अंतिम झालेली असेल. संघ व्यवस्थापनाने देखील २०२७ च्या विश्वचषकात रोहित शर्माच्या क्षमतेबाबत अनेक घडामोडींचे संकेतही दिले आहेत. निवड समितीतील बदलामुळे ही शक्यता आणखी वाढली आहे. कर्णधार शुभमन गिल सलामीवीर म्हणून त्याच्यासोबत असेल. विराट कोहलीचे स्थानही अनेक वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पक्के असल्याचे दिसते. तर चौथ्या क्रमांकावर संघाचा अविभाज्य भाग असलेला श्रेयस अय्यर धावा करत आहे. लोकेश राहुलने एकदिवसीय संघात पाचव्या क्रमांकावर फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. अशाप्रकारे, भारतीय संघाचे अव्वल पाच खेळाडू आधीच निश्चित झालेले दिसतात. आता जडेजाची एकदिवसीय मालिकेसाठी सहाव्या क्रमांकावर निवड न झाल्यामुळे, अक्षर पटेलचा संघात समावेश होण्याची आणि तो विश्वचषकात खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अक्षरने गेल्या काही काळात चांगली कामगिरीही केली आहे. त्यामुळे, विश्वचषक २०२७ साठी भारताचे अव्वल सात खेळाडू जवळपास निश्चित झाले आहेत आणि गिलने आपल्या वक्तव्यात याचे संकेतही दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >