Wednesday, November 4, 2026

Gold Silver Rate Hike : दिवाळीपूर्वीच खरेदीदारांना मोठा झटका ! सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला धक्का, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या दरात वाढ

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभवाचा धक्का बसल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात घडलेल्या घडामोडींचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर झाल्याचे सांगितले जात आहे. डॉलर कमजोर झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी चमकले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात 2.34 टक्क्यांची वाढ झाली असून, सोने प्रति औंस 4,023 डॉलरवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही चार टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली आहे. चांदीचा दर प्रति औंस 52 डॉलरवर पोहोचला आहे.अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर डॉलर कमजोर झाल्याने बाजारातील समीकरणांमध्ये बदल झाला आहे. याचाच परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर झाल्याचे दिसून येत आहे.

एमसीएक्सवर सोन्याचे दर 1.42 लाखांवर

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 4 डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा दर 1,42,353 रुपयांवर पोहोचला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 1,86,081 रुपयांवर नोंदवण्यात आला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून जारी करण्यात येणारे सोन्या-चांदीचे दर देशभरात समान असतात. या दरांनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे.

3 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,37,576 रुपये होता. आज हा दर वाढून 1,41,062 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, एका तोळ्यामागे सोनं 3,486 रुपयांनी महागलं आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात सोन्याने उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोन्याचे दर जवळपास 40 हजार रुपयांनी कमी असल्याचे सांगितले जात आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,26,020 रुपये होता. आज हा दर वाढून 1,29,213 रुपयांवर पोहोचला आहे.यामुळे 22 कॅरेट सोनं प्रति तोळा 3,193 रुपयांनी महागलं आहे.

चांदीच्या दरात 7,775 रुपयांची वाढ

सोन्याच्या दरातील तेजीचा परिणाम चांदीच्या बाजारातही दिसून आला आहे. एक किलो चांदीचा दर 1,76,425 रुपयांवरून वाढून 1,84,200 रुपयांवर पोहोचला आहे.म्हणजेच, चांदीच्या दरात एका किलोमागे 7,775 रुपयांची वाढ झाली आहे.सोने आणि चांदीच्या दरातील या तेजीमुळे ग्राहकांना खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >