Entertainment News: रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. मालिकेचे प्रसारण होऊन अनेक वर्षे उलटली, तरी त्यातील दृश्ये, कलाकारांचा अभिनय आणि सादरीकरणाची चर्चा आजही केली जाते. विशेष म्हणजे, त्या काळात आधुनिक CGI आणि VFX तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही रामानंद सागर आणि त्यांच्या टीमने कल्पकतेच्या जोरावर अनेक भव्य दृश्ये पडद्यावर साकारली होती. यासाठी महागड्या तंत्रज्ञानाऐवजी कॅमेऱ्याच्या युक्त्या, छोट्या प्रतिकृती आणि काही पारंपरिक पद्धतींचा वापर करण्यात आला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) बोरीवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण न हटवल्यामुळे ...
कापूस, अगरबत्ती आणि धुपाचा वापर
मालिकेतील धुके आणि ढग दाखवण्यासाठी कॅमेऱ्यासमोर किंवा काचेच्या पृष्ठभागाजवळ कापूस ठेवला जात असे. सेटवर धुके आणि दवाचा आभास निर्माण करण्यासाठी अगरबत्ती आणि धुपाचाही वापर केला जात होता. साध्या साधनांच्या मदतीने दृश्यांना वेगळा परिणाम देण्याचा प्रयत्न केला जात असे.
पर्वत आणि शिवतांडवाची दृश्ये कशी तयार केली?
मोठे पर्वत दाखवण्यासाठी 10 ते 15 फूट उंचीच्या लहान प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. कॅमेऱ्याच्या विशिष्ट कोनांचा वापर करून त्या खऱ्या पर्वतांसारख्या दिसतील, अशी मांडणी केली जात असे.
शिवतांडवाच्या दृश्यासाठी स्लाइड प्रोजेक्टरचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते. पार्श्वभूमीत ग्रहांच्या छोट्या प्रतिकृती ठेवून स्लाइड्सच्या साहाय्याने दृश्य अधिक प्रभावी बनवण्यात आले होते.
कॅमेऱ्याच्या युक्त्यांनी दाखवले पुष्पक विमान
देवदेवतांचे हवेत उडतानाचे प्रसंग आणि रावणाचे पुष्पक विमान दाखवण्यासाठी कॅमेऱ्याच्या युक्त्या आणि तारांचा वापर केला जात असे. कलाकारांना विशिष्ट पद्धतीने आधार देऊन ते हवेत उडत असल्याचा आभास निर्माण केला जात होता. याशिवाय प्लास्टर ऑफ पॅरिस, बांबू, गवत आणि लाकूड यांपासून विविध वस्तू तयार करण्यात आल्या होत्या.
युद्धाच्या दृश्यांसाठी विशेष मशीन
रामायणातील युद्धप्रसंग अधिक प्रभावी करण्यासाठी SEG 2000 नावाच्या मशीनचा वापर करण्यात आल्याचा उल्लेख आहे. बाणांची टक्कर, ठिणग्या आणि दैवी अस्त्रांचे परिणाम दाखवण्यासाठी या मशीनची मदत घेतली जात होती. मेकॅनिकल इफेक्ट्स आणि ग्लास मॅटिंगसारख्या तंत्रांचाही वापर करण्यात आला. युद्धाच्या भव्य दृश्यांसाठी सुमारे 2,000 ज्युनियर कलाकार सहभागी झाल्याचे वृत्त आहे.
कुंभकर्णाचा वध दाखवण्यासाठी खास साचे
कुंभकर्णाच्या वधाचे दृश्य तयार करणे हेही मोठे आव्हान होते. या प्रसंगासाठी कुंभकर्णाच्या चेहऱ्याचा साचा तयार करण्यात आला होता. तसेच शरीराचे तुटलेले अवयव दाखवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून कृत्रिम अवयव बनवण्यात आले होते.
गुजरातमधील उमरगाव येथे उभारले होते सेट
रामायण मालिकेचे चित्रीकरण गुजरातमधील उमरगाव येथे करण्यात आले. अयोध्या, लंका, मिथिला आणि किष्किंधा यांसारख्या ठिकाणांचे सेट याच परिसरात उभारण्यात आले होते. त्यामुळे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांचे आणि राजवाड्यांचे दृश्य चित्रीत करणे शक्य झाले.
रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांच्या म्हणण्यानुसार, चित्रीकरणासाठी ठरावीक कॉलशीट किंवा वेळापत्रक नसे. रामानंद सागर यांनी एखाद्या दृश्याचे लेखन पूर्ण केले की त्यानंतर चित्रीकरण सुरू होत असे.
प्रत्येक भागासाठी किती होते बजेट?
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘रामायण’ मालिकेच्या प्रत्येक भागासाठी अंदाजे 9 लाख रुपयांचे बजेट होते. त्या काळात हे मोठे बजेट मानले जात होते. मर्यादित साधने आणि उपलब्ध तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून तयार केलेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.