WBBL: शेवटच्या चेंडू आणि सुपर ओवरची तयारी, पण विकेटकीपरची एक चूक आणि सामना गेला Video
वुमन बिग बॅश लीग स्पर्धेतील एक सामना रोमहर्षक ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचं काय होणार? याबाबत उत्सुकता होती. पण या सामन्यात विकेटकीपर एक चूक केली आणि सामन्याचं चित्रच पालटलं. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात..
November 5, 2026 04:31 PM
WBBL: शेवटच्या चेंडू आणि सुपर ओवरची तयारी, पण विकेटकीपरची एक चूक आणि सामना गेला (Photo: Video Grab)
क्रिकेटमध्ये कोणत्या चेंडूवर सामन्याचं गणित पालटून जाईल हे काही सांगता येत नाही. अनेकदा हा सामना गेला असं वाटतं, तिथे चमत्कार घडतो. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकतं. या बाबतचं उत्तम उदाहरण वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत पाहायला मिळालं. मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात लढत झाली. हा अतितटीचा झाला आणि शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा वाढवणारा ठरला. होबार्टच्या बेलेरिव ओव्हलमध्ये रंगलेल्या या सामन्यात का घडणार? याची उत्सुकता होती. पण शेवटच्या चेंडूवर असं काही घडलं की क्रीडाप्रेमींना आश्चर्य व्यक्त करण्याशिवाय पर्याय उरला नाही. सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत धावा बरोबर होत्या. त्यामुळे हा चेंडू निर्धाव गेला असता तर सामना सुपर ओवरमध्ये गेला असता. पण तसं झालं नाही. पण एक रिव्ह्यूने सामन्याचं चित्र बदलून टाकलं आणि मेलबर्न रेनेगेड्सने हा सामना 4 गडी राखून जिंकला.
शेवटच्या षटकात काय झालं?
होबार्ट हरिकेन्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमवून 154 धावा केल्या आणि विजयासाठी 155 धावा दिल्या. या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात मेलबर्न रेनेगेड्सला 7 धावांची गरज होती. सहा धावा झाल्या की सामना सुपर ओव्हरमध्ये जाणार हे निश्चित होतं. निकोल फाल्टम आणि डिएंड्रा डॉट्टिन या दोघी मैदानात होत्या. डिएंड्राने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून निकोलला स्ट्राईक दिली. त्यानंतर निकोलने दुसरा चेंडू निर्धाव घालवला आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत डिएंड्राला स्ट्राईक दिली. डिएंड्राने चौथा चेंडू निर्धाव घालवला आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर एक धाव अशी स्थिती आली. या चेंडूवर फटका मारताना डिएंड्रा चुकली आणि चेंडू निर्धाव गेला. पण येथेच ट्वीस्ट आला.
“Cricket is cruel.”
We thought we had a Super Over, but it’s the @RenegadesBBL who claim victory over the @HurricanesBBL in extraordinary fashion! #WBBL12 https://t.co/fIrkS0rIQw
— Weber Women's Big Bash League (@WBBL) November 4, 2026
विकेटकीपरचं काय चुकलं?
शेवटचा चेंडू विकेटकीपरने पकडला आणि स्टम्पिंगसाठी अपील केली. या अपीलनंतर विकेट पडण्याऐवजी सामन्याचं चित्र बदललं. रिव्ह्यूत स्पष्ट झालं की विकेटकीपर लिजेल लीने चेंडू स्टंपच्या पुढे पकडला होता. हे एमसीसी नियम 27.3 चं उल्लंघन मानलं गेलं. या नियमानुसार, गोलंदाजाने चेंडू टाकल्याच्या क्षणापासून ते चेंडू फलंदाजाच्या बॅटला किंवा शरीराला लागेपर्यंत, स्ट्रायकरच्या बाजूची यष्टी ओलांडून जाईपर्यंत किंवा फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करेपर्यंत यष्टीरक्षकाने पूर्णपणे यष्टींच्या मागे उभे राहिले पाहिजे. जर यष्टीरक्षकाने या नियमाचे उल्लंघन केले, तर पंच नो बॉल देतील. या नियमानुसार पंचांनी नो बॉल दिला. जो चेंडू निर्धाव असेल आणि त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल असं वाटलं, तोच चेंडू त्यांच्या पराभवाचे कारण ठरला.