Friday, November 6, 2026

Nashik : कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा ! नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 37 शेतकऱ्यांचा चौथ्या यादीत समावेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी; आतापर्यंत ४० हजार २५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

Nashik : नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत जिल्ह्यातील १ हजार ३७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.

कर्जमुक्तीच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी केले आहे. प्रसिद्ध झालेल्या याद्यांनुसार नाशिक जिल्ह्यात आजअखेर एकूण ४० हजार २५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांच्या ४ हजार १८६ पात्र लाभार्थ्यांना ४८ कोटी ६३ लाख रुपये, तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार १८९ पात्र लाभार्थ्यांना ७ कोटी २७ लाख रुपये, अशी एकूण ५ हजार ३७५ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर ५५ कोटी ९० लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली व दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली तसेच दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात ६३ हजार ३१९ पात्र कर्जखात्यांची नोंद

योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली असून, योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी व ग्रामीण बँकांनी ४२ हजार ५४६ पात्र शेतकऱ्यांची, तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २३ हजार ७७३ पात्र शेतकऱ्यांची, अशी एकूण ६३ हजार ३१९ पात्र थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.

महाआयटीकडून संगणकीय प्रणालीद्वारे तपासणी केलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीत ३५ हजार ८९०, दुसऱ्या यादीत ३ हजार ८०६, तिसऱ्या यादीत ४ हजार ६९१, तर आता प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत १ हजार ३७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण ४५ हजार ४२४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.प्रसिद्ध झालेल्या याद्यांनुसार नाशिक जिल्ह्यात आजअखेर एकूण ४० हजार २५१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी

योजनेच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राला किंवा कॅफेला भेट देऊन विनामूल्य आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच आधार प्रमाणीकरण करताना आधार क्रमांक, कर्जाची रक्कम व बँक कर्जखाते क्रमांक याबाबत काही तक्रार अथवा तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेच्या शाखेशी किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कुंदन भोळे यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >