
Nashik Crime : प्रेमसंबंधातील वादातून एका १८ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे घडली आहे. गावाजवळील स्मशानभूमी परिसरात हा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेमुळे सापगावसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
स्मशानभूमीजवळ तरुणावर जीवघेणा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास सापगाव ते फेरी मार्गावरील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. आर्यन सोमनाथ कांबळे (वय १८) याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आदित्य एकनाथ मोढे (वय २०, रा. शिरसगाव, ता. त्र्यंबकेश्वर) याने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
कळवण : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. कळवण तालुक्यातील जामशेद येथील २४ वर्षीय राहुल भाऊराव साबळे याने ...
गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यात आर्यन याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर वार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोटाच्या डाव्या बाजूला, गळ्यावर, छातीवर आणि हातावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी रोशन पप्पू कांबळे (वय २३, रा. सापगाव) यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक २०९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्र्यंबकेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत. प्रेमसंबंधाच्या वादातून घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.






