मुंबई (विशेष प्रतनिधी)
मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातील कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. तब्बल १२ तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर ऑनलाईन बदलीची अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. महापालिकेत प्रथमच ऑनलाईन बदलीची प्रक्रिया राबवण्यात आली असून १५२ कनिष्ठ अभियंता, ४४४ दुय्यम अभियंता आणि ९९ सहाय्यक अभियंता अशा एकूण ६९५ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात बदली करण्याची ही पहिलीच घटना असून दिवाळीतच या बदल्यांचा बंपर धमाका फुटल्याने कुणाची दिवाळी आनंदमय तर कुणाची निराशामय होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मान्यतेने आणि अतिरिक्त आयुक्त अविनाश धाकणे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेतील ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधी एकाच पदावर असलेल्या अभियंत्यांच्या बदलीचा निर्णय घेतला आहे. आजवर बदलीसाठी वशिलेबाजी केली जात असल्याने तसेच आमदार मिहिर कोटेच्या या मागणीनुसार य बदली ऑनलाईन पध्दतीने करण्याचा विचार प्रशासनाने केला होता. त्यानुसार बदलीची ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु बरेच दिवस उलटूनही ही यादी प्रसिध्द केली जात नव्हती.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्य ...
मुंबई महानगरपालिकेच्या २७ जानेवारी २०२१ रोजीच्या धोरणानुसार दरवर्षी अभियंता संवर्गातील बदल्या केल्या जातात. संबंधित खात्यात किंवा विभागात तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकूण अभियंत्यांपैकी २५ टक्के अभियंत्यांच्या बदल्या करण्याची तरतूद आहे. या धोरणानुसार बदली पात्र अभियंता व विभागांच्या आवश्यकतेचा विचार करून नगर अभियंता कार्यालयामार्फत अभियंत्यांच्या बदल्या प्रस्तावित करण्यात येतात. प्रमुख कार्यरत अभियंतावर्गाची आवश्यकता तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त, गर्भवती महिला, दिव्यांग आणि सेवानिवृत्तीस एक वर्षाचा कार्यकाल राहिलेल्या अभियंत्याच्या विनंतीच्या आधारे नियतकालिक बदल्या करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उप आयुक्त (पायाभूत सुविधा), उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यांचा सदस्य म्हणून तर नगर अभियंता यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे.
ही यादी अंतिम करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकाऱ्यांसह बैठक बुधवारी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती, ही बैठक रात्री पावणे अकरा वाजता संपली आणि त्यानंतरच ही यादी अंतिम करून प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये या बदलीस पात्र असलेल्या १५२ कनिष्ठ अभियंता, ४४४ दुय्यम अभियंता आणि ९९ सहाय्यक अभियंता अशा एकूण ६९५ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पदोन्नती व पदस्थापना प्रक्रिया, प्रशासकीय आवश्यकता, रिक्त पदांची उपलब्धता, अभियंत्यांकडून प्राप्त झालेले विनंती अर्ज तसेच विभागाकडून प्राप्त शिफारशी या सर्व बाबींचा सम्यक विचार करून ही बदली प्रक्रिया पारदर्शक, निःपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. . यासाठी बदली पात्र अभियंत्यांनी ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून आपल्या पसंतीचे प्राधान्यक्रम नोंदविले होते. त्या पैकी १५२ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत), ४४४ दुय्यम अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत) आणि ९९ सहाय्यक अभियंता (स्थापत्य आणि यांत्रिकी व विद्युत) यांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे कार्यादेशही जारी करण्यात आले आहेत.