Saturday, November 7, 2026

गर्भवती महिलांसाठी मोठी बातमी! कामा रुग्णालयाचा मोठा निर्णय, सुट्टीच्या दिवशीही 'ही' महत्त्वाची सेवा राहणार सुरू

मुंबईच्या कामा आणि अल्ब्लैस रुग्णालयाने गर्भवती महिलांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाची अँटेनेटल केअर (ANC) ओपीडी 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे, ज्यामुळे दूरवरून येणाऱ्या महिलांची गैरसोय टाळता येईल.

मुंबई: मुंबई आणि उपनगरांमधून उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांसाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अनेक महिला दूरवरून प्रवास करून रुग्णालयात येतात, अशातच जर ओपीडी बंद असेल तर त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन मुंबईच्या प्रसिद्ध कामा आणि अल्ब्लैस रुग्णालयाने 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी आपली अँटेनेटल केअर (ANC) म्हणजेच प्रसुतीपूर्व काळजी बाह्यरुग्ण विभाग (OPD) सुरू ठेवण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दूरवरच्या प्रवासाचा त्रास वाचणार

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशानुसार, मुंब्रा, भिवंडी आणि इतर दूरच्या भागातून मोठ्या संख्येने गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी येतात. अनेकदा सुट्टीची माहिती नसल्यामुळे या महिलांना रुग्णालयात आल्यावर माघारी जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. हाच त्रास टाळण्यासाठी रुग्णालयाने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रोजी इतर सर्व ओपीडी नेहमीप्रमाणे चालू राहतील, परंतु 11 नोव्हेंबर रोजी इतर विभागांच्या ओपीडी बंद राहतील. मात्र, गर्भवती महिलांच्या आरोग्यात कोणतीही कसूर राहू नये यासाठी ANC ओपीडी मात्र दोन्ही दिवस पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहे. या विशेष उपक्रमामुळे लांबून येणाऱ्या मातांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचे नियमित उपचार वेळेवर पार पडतील.

कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे कडक निर्देश

या दोन दिवसांत रुग्णालयात येणाऱ्या महिलांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर्स, नर्स आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांना ANC विभागात उपस्थित राहण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. याविषयी बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे म्हणाले, "सुट्टीच्या दिवशी ओपीडी बंद असल्यामुळे दूरवरून प्रवास करून येणाऱ्या गर्भवती महिलांच्या महत्त्वाच्या तपासण्या चुकतात. त्यांना होणारा त्रास टाळणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >