
मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत धारावी येथे उभारण्यात येत असलेल्या ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या (एटीपी) कामाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुंबई महानगराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आतापर्यंत ७६ टक्के भौतिक प्रगती झाली असून, निर्धारित नियोजनापेक्षाही अधिक वेगाने काम सुरू आहे. जुलै २०२७ पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असले, तरी प्रकल्पाची उर्वरित कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी यावेळी दिले. त्यामुळे जुनपासून २०९ दशलक्ष लिटर पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पस्थळ पाहणीदरम्यान बांगर यांनी मलजल प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रक्रिया टाक्या, इनलेट व आउटलेट व्यवस्था, पंप हाऊस, गाळ प्रक्रिया युनिट अंतर्गत पाइपलाइन तसेच अन्य स्थापत्य कामांच्या प्रगतीची माहिती घेतली. याशिवाय पंप, एरेशन ब्लोअर्स, स्क्रीनिंग यंत्रणा, गाळ प्रक्रिया यंत्रणा, विविध यांत्रिक उपकरणे आणि पाइपिंगच्या उभारणीची पाहणी केली. विद्युत अभियांत्रिकी कामांचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
मर्यादित जागेत वैशिष्ट्यपूर्ण बहुमजली रचनेत प्रकल्पाची उभारणी
मुंबईतील जलप्रदूषण रोखून पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेकडून धारावी येथे ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामास ५ जुलै २०२२ रोजी सुरुवात झाली. प्रकल्पासाठी उपलब्ध जागेची मर्यादा लक्षात घेऊन वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या बहुमजली इमारतीमध्ये या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.
बापट नाला आणि सफेद पूल येथून मिठी नदीत थेट मिसळणारे मलजल दुहेरी बोगद्याद्वारे संकलित करून धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात येणार आहे. यामुळे सुमारे १६८ दशलक्ष लीटर मलजल मिठी नदीत मिसळण्यापासून रोखून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. परिणामी, मिठी नदीतील जलप्रदूषण कमी होण्यास आणि नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) बोरीवली पूर्व येथील बेस्ट बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण न हटवल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे ...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मलजल प्रक्रिया व वीजनिर्मिती
या प्रकल्पामध्ये सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर (एबीआर) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यानुसार, दररोज ४१८ दशलक्ष लीटर मलजलावर द्वितीय स्तरीय प्रक्रिया, तर त्यापैकी २०९ दशलक्ष लीटर मलजलावर तृतीय स्तरीय प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासोबतच, वर्ग 'अ' दर्जापर्यंत गाळ प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्यात येणार असून, त्यामुळे ऊर्जेची बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला चालना मिळणार आहे.
प्रकल्पाच्या कामांना गती द्या
दुहेरी बोगद्याच्या लॉन्चिंग शाफ्टचे काम नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करावे. संरक्षक भिंतीलगत बाधित झालेल्या बांधकामांचे संबंधित विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पुनर्वसन करावे. तसेच, संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्त्यांची कामे विनाविलंब पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
द्वितीय स्तरीय प्रक्रियेच्या लिक्विड लाईनचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सध्या प्रकल्पस्थळी दररोज ६८८ मनुष्यबळ कार्यरत आहे. जुलै २०२७ पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असले, तरी प्रकल्पाच्या कामांना अधिक गती देऊन मे २०२७ पर्यंत उभारणीची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी यावेळी दिले. या पाहणी दौऱ्यादरम्यान उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, सहायक आयुक्त (जी दक्षिण विभाग) योगेश देसाई, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) राजेंद्र परब तसेच संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.





