
घाटकोपर : मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कुकरजा पॅलेस या उंच इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. 6 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 8:08 वाजता ही आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. अग्निशमन दलाने सुरुवातीला लेव्हल-1 आणि त्यानंतर लेव्हल-2 चा कॉल घोषित केला. या घटनेत 3 जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये चार शासकीय तज्ज्ञ संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या ...
आगीवर नियंत्रण, इमारत रिकामी
घाटकोपर पूर्वेतील पंतनगर परिसरातील वल्लभ बाग लेन येथे कुकरजा पॅलेस ही तळमजला अधिक 25 मजल्यांची निवासी इमारत आहे. या इमारतीच्या 23 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. इमारतीत कोणी अडकले आहे का, याची खात्री करण्यासाठी शोधमोहीमही सुरू करण्यात आली.
तीन जण जखमी; प्रकृती स्थिर
या आगीत साईनाथ आवळे (45) हे 27 टक्के भाजले असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झालेल्या निरव लोढाया (34) आणि राजेश लोढाया (47) यांनाही झिनोव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.






