Wednesday, October 28, 2026

लॅपटॉप लॉगआउट, सिस्टिम सुद्धा बंद; Innodata कंपनीतील 550 कर्मचाऱ्यांना नारळ

इनोडेटामध्ये भारतातील सुमारे 550 कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्याचे वृत्त आहे. फिलिपिन्समध्येही त्याच सुमारास कपात झाल्याचे सांगितले जात असून, कंपनीने एकूण आकडा अद्याप जाहीर केलेला नाही.

नवी दिल्ली: AI आल्यापासून IT सह अनेक वेगवेगळ्या इंडस्ट्रीतील नोकऱ्या गेल्या आहेत. आता डेटा इंडस्ट्रीमध्ये सेवा देणाऱ्या कंपन्यांमधीलही नोकरी जात असल्याची माहिती आहे. डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीत भारतातील सुमारे 550 कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. फिलिपिन्समधील कर्मचाऱ्यांमध्येही त्याच सुमारास कपात झाल्याचे सांगितले जात आहे. कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी काम सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांच्या अधिकृत लॅपटॉप आणि आयडीचे ॲक्सेसच बंद करण्यात आले. त्यानंतर HR टीमकडून खासगी ईमेलवर टर्मिनेशनचाच मेल पाठवण्यात आला आहे.

डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीने केलेल्या ह्या अचानक नोकरकपातीमुळे अनेक नोकरदारांना झटकाच बसला आहे. दरम्यान, इनोडेटा कंपनीने अद्याप किती कर्मचार्‍यांना नारळ दिलेला आहे, याचा आकडा सार्वजनिकरित्या जाहीर केलेला नाही. कंपनीच्या HR टीमने कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक ईमेलवर टर्मिनेशनचाच मेल पाठवण्यात आला होता. ज्यात 26 ऑक्टोबर हाच शेवटचा कामाचा दिवस असल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनीकडून देण्यात आलेल्या लेटरमध्ये, संबंधित इंडस्ट्रीमध्ये काम कमी असल्यामुळे नोकर कपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या नोकर कपातीचा कोणताही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कामगिरिशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दिल्लीमध्ये असलेल्या डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली. सर्व कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरूवात केली. ज्याचे त्याचे आपआपले काम सुरू होते. लंच ब्रेकच्या आधीच संपूर्ण ऑफिसमध्ये नोकरकपातीच्या चर्चा सुरू झाल्या. ज्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. भारतासह फिलिपिन्समध्येही कर्मचाऱ्यांची नोकरकपात करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. कंपनीच्या HR टीमने एका झूम मिटिंगच्या माध्यमातून नोकरदारांना काढून टाकल्याची माहिती दिली आहे, अचानक कामावरून काढून टाकल्यामुळे नोकरदारांच्या चिंता आणखीन वाढल्या आहेत.

भारतातील कर्मचार्‍यांनी HR पोर्टल तपासून पाहिले असता, HR आणि मॅनेजमेंट टीमने त्यांची पेमेंट स्लीप सुद्धा तयार करून पाठवली होती. शिवाय, कालचा म्हणजे 26 ऑक्टोबर नोकरीचा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले होते. डेटा सेवा क्षेत्रातील इनोडेटा कंपनीमध्ये झालेल्या ह्या मोठ्या नोकरकपातीची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >