Monday, November 9, 2026

मुंबईकरांसाठी खूशखबर! बोरीवली- कांदिवलीकरांचा प्रवास होणार आणखी सोपा, बेस्टची 'ही' नवीन बस धावणार!

बोरीवली आणि कांदिवलीकरांच्या प्रवासाचा त्रास आता संपणार असून, बेस्टने एका नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बस मार्गाची सुरुवात केली आहे. जाणून घ्या या बसचा मार्ग, वेळ आणि इतर महत्त्वाची माहिती.

मुंबई: बोरीवली आणि कांदिवली परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. मुंबई उपनगरामध्ये प्रवास अधिक सुकर करण्यासाठी 'बेस्ट' (BEST)ने एक नवीन वातानुकूलित (AC) वर्तुळाकार बस मार्ग सुरू केला आहे. या नव्या बसमुळे हजारो प्रवाशांचा रोजचा प्रवास अधिक आरामदायक आणि सोपा होणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर, आजपासून (09 नोव्हेंबर- सोमवार) सुरू झालेला हा नवीन बस मार्ग बोरीवली रेल्वे स्टेशन (पूर्व) येथून धावणार असून, यामुळे बोरीवली आणि कांदिवली भागातील प्रमुख रहिवासी परिसराला उत्तम कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे. 'ए-६३६' (A-636) अशी ही नवीन बस असून, ही नवीन एसी बस अनेक महत्त्वाच्या वस्तींमधून प्रवास करणार आहे.

कोणकोणत्या परिसराला मिळणार फायदा

हा नवीन बस मार्ग गौतम नगर आणि अलिका नगर यांसारख्या महत्त्वाच्या रहिवासी भागांतून जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत सुविधा मिळणार आहे. बेस्ट एसी बस बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानक, बोरिवली रेल्वे कम्पाऊंड मार्ग, महात्मा गांधी मार्ग, ओंकारेश्वर मंदिर, सर आलियावर जंग महामार्ग, समता नगर जंक्शन, समता नगर, ठाकुर महाविद्यालय, 120 फुट मार्ग, आकुर्ली मार्ग, गौतम नगर, अलिका नगर, क्रांती नगर आणि पुन्हा त्याच मार्गे उलट दिशेने ही बस बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानकाकडे जाणार आहे. एक अर्थी ही बस रिंगरुट प्रमाणे चालवली जाणार आहे. दररोज ही पहिली बस सकाळी 6.40 मिनिटांनी सुटणार असून शेवटची बस रात्री 10 वाजता सुटेल. दैनंदिन प्रवासादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता, हा नवीन वातानुकूलित बस मार्ग नागरिकांसाठी एक उत्तम आणि खात्रीशीर पर्याय ठरणार आहे.

विशेषतः या परिसरातील चाकरमानी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बेस्ट बस दररोज धावणार असून दर 17 ते 20 मिनिटांनी ही बस मार्गावर धावणार आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स ते बोरिवली (पूर्व) रेल्वे स्थानक या मार्गावर ही एसी बस धावणार आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात कनेक्टिव्हिटीच्या ज्या अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी आणि नागरिकांना आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी ही वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे, असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या बसच्या सुविधेमुळे अनेकांना मोठा फायदा मिळणार आहे. दरम्यान, या बससाठी बीएमसीच्या प्रभाग क्र. 27 च्या नगरसेविका नीलम गुरव यांनी पत्रव्यवहार करून नागरिकांसाठी ही बस सुविधा उपलब्ध केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >