Monday, November 9, 2026

Mumbai Fire work Ban: मुंबईत रॉकेटसह आकाशात उडणाऱ्या फटाक्यांच्या वापरावर बंदी

शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून निर्देश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई शहर व उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः रॉकेट व आकाशात उडणारे तत्सम फटाके नजिकच्या इमारतींच्या छत, बाल्कनी, खिडक्यांमध्ये तसेच ज्वलनशील साहित्यावर पडून आग लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती, उंच इमारती, झोपडपट्टी क्षेत्र, अरुंद रस्ते आणि निवासी व व्यावसायिक इमारतींची मोठी संख्या लक्षात घेता, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रॉकेटसह आकाशात उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंधात्मक बंदी घालण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.(MumbaiFireworkBan)

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 41 (ए) (सुधारित), कलम 26 (2), कलम 30 व 34 (एम) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, अध्यक्ष, शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,मुंबई यांच्याकडून मुंबई महानगरपालिका हद्दीत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी या नियमांचे आणि आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई यांच्याकडून जारी निर्देशांनुसार, निवासी इमारती, इमारतींचे टेरेस, गच्ची, बाल्कनी, अंगणे, वाहनतळ, झोपडपट्टी क्षेत्रे तसेच इतर सर्व परिसरांना ही बंदी लागू राहणार आहे. हे आदेश 9 नोव्हेंबर 2026 पासून 25 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित परिमंडळीय पोलीस उपायुक्त, महानगरपालिकेचे प्रशासकीय विभागांचे (वार्ड ऑफिस) सहायक आयुक्त आणि मुख्य अग्निशमन अधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.(MumbaiDiwaliRules)

महापौरांचे जनतेला आवाहन

दिपावली हा आनंद, प्रकाश आणि मांगल्याचा सण आहे, पण मागील दोन दिवसांमध्ये मुंबईत फटाक्यांच्या विविध ठिकाणी घडल्याची गंभीर घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर या नात्याने रितू तावडे यांनी जनतेला आवाहन करून आपल्या सणाचा आनंद कुणाच्या दु:खाचे कारण ठरू नये. यासाठी फटाके फोडताना सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक रस्ते, गल्ल्या, पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. त्याचे कृपया पालन करावे, रॉकेट किंवा आकाशांत उडणारे फटाके फोडणे टाळले पाहिजे. कारण खिडक्या, बाल्कनी, गच्चीच्य दिशेने असे अनेक फटाके जातात आणि आग लागून निष्पाप मनुष्यहानी किंवा मालमत्तेची हानी होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेवून फटाके फोडावे असे आवाहन त्यांनी केले आहे.(RocketCrackersBan)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >