राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनाही बसला आहे. मासेमारीतून मिळणारे उत्पन्न घटल्याने अनेक कुटुंबांसमोर आर्थिक विवंचना उभी राहिली आहे. दिवाळीसारखा आनंदाचा सण आला असतानाही अनेक घरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या बांधवांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आज वर्सोवा येथे मच्छीमार बांधवांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज, ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता राणे हे वर्सोवा येथील मनसा देवी मंदिर सभागृह, तेरे गल्ली, अंधेरी पश्चिम येथे पोहोचणार आहेत. तिथे ते मच्छीमार बांधवांशी मोकळेपणाने संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या भेटीदरम्यान मच्छीमारांच्या विविध समस्या, आर्थिक अडचणी आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे झालेले नुकसान याची सविस्तर माहिती राणे घेणार आहेत. गेल्या काही काळात हवामानातील बदल, मासेमारी बंदीचा कालावधी, इंधनाचे वाढलेले दर आणि बाजारात मिळणारा कमी भाव यामुळे मच्छीमारांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. अनेक कुटुंबांना कर्ज घेऊन घर चालवावे लागत असल्याचे चित्र आहे. या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather News: राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता हवामानात बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, तापमानात हळूहळू घट होत ...
मच्छीमार बांधवांनी यापूर्वीही मासेमारीसाठी लागणाऱ्या सुविधा, बंदरातील सोयी, बोटींची दुरुस्ती, तसेच महिलांसाठी रोजगाराच्या संधी याबाबत मागण्या केल्या होत्या. या भेटीत त्या मागण्यांचा आढावा घेतला जाणार आहे. सरकारकडून सुरू असलेल्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचतोय का, याचीही माहिती मंत्री नितेश राणे घेणार आहेत. वर्सोव्यातील मच्छीमार समाजाने या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंत्री नितेश राणे स्वतः आपल्या भेटीला येत असल्याने आपल्या समस्या सोडवल्या जातील, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. या भेटीनंतर मच्छीमारांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याबाबत सरकारकडून पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.