Monday, November 9, 2026

Ashok Saraf Lamborghini video: अशोक सराफांचा लॅम्बोर्गिनीतील व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले; मामांनी दिलं मजेशीर उत्तर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये बसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचे समोर आले. आता खुद्द अशोक मामांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. 'बहुतेक माझ्यावर धाड येते...' असं म्हणत त्यांनी आपल्या खास विनोदी शैलीत उत्तर दिलं.

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आपल्या विनोदी अभिनयाने आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वाने त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अशोक सराफ यांना चाहते प्रेमाने 'अशोक मामा' म्हणतात. सध्या अशोक मामा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा लॅम्बोर्गिनी कारमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता या व्हिडीओवर खुद्द अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून चाहत्यांनाही हसू आवरता येणार नाही.

नेमका काय आहे व्हायरल व्हिडीओ?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते राखाडी रंगाचा कुर्ता आणि पांढरे धोतर अशा पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. त्यांच्या पायात भगव्या रंगाच्या चपला आहेत. व्हिडीओमध्ये अशोक सराफ एका इमारतीतून बाहेर येतात आणि समोर उभ्या असलेल्या भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी कारकडे जातात. विशेष म्हणजे गाडीत बसण्यापूर्वी ते आपल्या पायातील चपला काढतात आणि त्यानंतर कारमध्ये बसतात. त्यांचा हा साधेपणा आणि महागड्या कारमधील विरोधाभास नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरला.(Ashok Saraf viral video)

हा व्हिडीओ खरा की AI ने बनवलेला?

अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी खरंच लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. मात्र, हा व्हिडीओ खरा नसून AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओमधील काही चुका देखील शोधून काढल्या. अशोक सराफ गाडीत बसताना त्यांच्या पायात वेगळ्या चपला दिसतात, तर गाडीतून उतरताना चपलांचा रंग बदललेला दिसतो. एवढेच नाही तर काही दृश्यांमध्ये लॅम्बोर्गिनीऐवजी दुसऱ्याच कारसारखी गाडी दिसते. त्यामुळे हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

'बहुतेक माझ्यावर धाड येते...' अशोक मामांची प्रतिक्रिया

अशोक सराफ यांनी अलीकडेच सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांना त्यांचा व्हायरल झालेला लॅम्बोर्गिनीमधील व्हिडीओ दाखवण्यात आला. 'अशोक मामा, गाडी घेतली का तुम्ही? हा व्हिडीओ पाहिला का? एवढे पैसे आहेत का तुमच्याकडे?' असा मिश्कील प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अशोक सराफ यांनी आपल्या खास विनोदी शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, 'बघ ना, वांदे झाले ना आता... बहुतेक माझ्यावर आता धाड वगैरे येते...' पुढे त्यांनी व्हिडीओमधील एका गोष्टीचे कौतुकही केले. ते म्हणाले, 'या सगळ्यात एकच गोष्ट चांगली आहे. बाकी गाड्या वगैरे काही नाही, चपला उचलून मी स्वतः ठेवतो आहे.' त्यांच्या या उत्तराने मुलाखतीत हास्याचे वातावरण निर्माण झाले. स्वतःच्याच व्हायरल व्हिडीओवर अशोक सराफ यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.(Marathi actor Ashok Saraf)

 

स्वप्नील जोशीचीही व्हिडीओवर कमेंट

अशोक सराफ यांच्या या व्हिडीओने केवळ चाहत्यांचेच नाही, तर मनोरंजनविश्वातील कलाकारांचेही लक्ष वेधून घेतले. अभिनेता स्वप्नील जोशी याने या व्हिडीओवर 'This Is Lit' अशी कमेंट केली होती. त्यामुळे व्हिडीओची चर्चा आणखी वाढली.

आगामी चित्रपटामुळेही अशोक सराफ चर्चेत

दरम्यान, अशोक सराफ लवकरच 'आदी अनंत' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे एकीकडे आगामी चित्रपटाची उत्सुकता आणि दुसरीकडे व्हायरल व्हिडीओमुळे अशोक मामा सध्या चर्चेत आहेत.(Ashok Saraf funny reply)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >