मुंबईतील पहिल्या रोपवे प्रकल्पाच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (एसजीएनपी) हद्दीतील तारामती माता मंदिरापर्यंत प्रस्तावित रोपवे उभारण्यासाठी सविस्तर वास्तुरचनात्मक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) सल्लागार नियुक्तीसाठी निविदा मागविल्या आहेत. मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी यापूर्वी निवडणुकीदरम्यान या रोपवेची मागणी केली होती. परिसरातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
निविदा प्रक्रियेचे स्वागत करताना आमदार मिहिर कोटेचा म्हणाले, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून डोंगरमाथ्यावरील निसर्गरम्य परिसरात असलेल्या तारामती माता मंदिरापर्यंत रोपवे उभारण्याचे आश्वासन आम्ही दिले होते. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या वास्तुरचनात्मक आराखड्यासाठी पीडब्ल्यूडीने सल्लागार नियुक्तीची निविदा काढल्याचा आनंद आहे. दरम्यान, प्रस्तावित रोपवे मुलुंड ते बोरिवली असा व्यावसायिक स्वरूपाचा नसल्याचे कोटेचा यांनी स्पष्ट केले. हा रोपवे केवळ मुलुंड परिसरापुरताच मर्यादित असेल. मुलुंडच्या डोंगरपायथ्यापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील तारामती माता मंदिरापर्यंतच त्याची जोडणी असेल. बोरिवलीपर्यंत रोपवे जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने सोमवारी (09 नोव्हेंबर) बोरिवली रेल्वे स्टेशन पासून एक नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बस मार्ग सुरु केला ...
प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार झाल्यानंतर आणि केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांतर्गत डोंगरमाथ्यावर निरीक्षण मनोरा (ऑब्झर्व्हेटरी) उभारण्याचाही प्रस्ताव आहे. या ठिकाणाहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या तुळशी तलावाचे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे. रोपवेच्या माध्यमातून पर्यटकांना तारामती माता मंदिरात दर्शन घेता येईल. तसेच डोंगरमाथ्यावरील निरीक्षण मनोऱ्यातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येईल. मुंबईत सध्या एकही रोपवे नाही. त्यामुळे हा प्रकल्प मुलुंडसह संपूर्ण मुंबईतील पर्यटनाला चालना देणारा ठरेल, असे कोटेचा म्हणाले.
*निविदेतील कामाचे स्वरूप*
प्रस्तावित रोपवेसाठी योग्य मार्ग आणि स्थान निश्चित करणे, आवश्यक जमिनीचे क्षेत्रफळ ठरविणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोपवे प्रकल्पांचा अभ्यास करणे, अशी कामे नियुक्त करण्यात येणाऱ्या सल्लागाराला करावी लागणार आहेत. याशिवाय भूपृष्ठीय सर्वेक्षण, भू-तांत्रिक तपासणी, भू-मापनविषयक सर्वेक्षण, जलविषयक सर्वेक्षण आणि प्राथमिक पाहणी करणे, ही जबाबदारीही सल्लागारावर असेल. रोपवेचा सविस्तर मार्ग आणि यंत्रणेची रचना निश्चित करणे, प्रारंभिक व अंतिम स्थानकांची ठिकाणे निश्चित करणे आणि संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च तयार करणे, या बाबींचाही निविदेतील कामाच्या व्याप्तीत समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाचा सामाजिक, पर्यावरणीय, वनक्षेत्र आणि वन्यजीवांवर होणारा संभाव्य परिणाम यांचाही अभ्यास सल्लागाराला करावा लागणार आहे.