Wednesday, November 11, 2026

शेतकरी संकटात असताना कर्ज वसुलीसाठी तगादा नको! फायनान्स कंपन्यांना कृषीमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : “शेतकरी शेतातच उध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणींचा विचार करून फायनान्स कंपन्यांनी वाहने व इतर कुठल्याही स्वरुपाच्या कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये.,” असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिले. बुलढाणा जिल्ह्यात फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या वसुलीसाठी होत असलेल्या तगाद्याबाबत शासनाने कारवाई केली आहे. यासंदर्भात महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. फायनान्स कंपन्यांचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून यावर योग्य तो मार्ग काढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील लावंड वस्तीवर शेतकरी हनुमंत लावंड यांच्या घरी भेट देत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला तसेच जनावरे व शेळ्यांच्या गोठ्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीचे पंचनामे आणि पाणी उपलब्धतेच्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अग्रिम मदतीबाबत बोलताना भरणे म्हणाले की, पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर केल्यामुळे आतापर्यंत ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना प्रति ५ हजार रुपयांप्रमाणे ४ हजार ३७२ कोटी रुपयांची अग्रिम मदत देता आली. उर्वरित शेतकऱ्यांना देखील पुढील दोन-तीन दिवसांमध्ये मदत दिली जाईल. ही केवळ अग्रिम मदत असून यापुढेही शासनाकडून मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांमध्येही भरीव वाढ केली आहे. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.

२० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी

कर्जमाफीबाबत बोलताना कृषीमंत्री म्हणाले, आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये २० लाख ७२ हजार २५० शेतकऱ्यांना तब्बल १८ हजार ४० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. सोबतच दोन लाखांपर्यंतच्या कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेततळी, गाळ काढणे, मोफत बियाणे आणि वीजबिल सवलतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरू असून या सर्व योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जात असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >