
Weather News: महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट झाली असून, सकाळी, पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवत आहे. मात्र, दिवसा उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. दरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकणात उष्ण हवामान कायम
कोकण विभागात मागील काही दिवसांपासून उष्ण हवामान कायम आहे. येथे कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवस या भागात पावसाची शक्यता नसून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात गारवा
उत्तर महाराष्ट्रातही थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. या भागात कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान सुमारे 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील 2 ते 3 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला, तरी रात्री आणि पहाटे हवेत गारवा निर्माण होत आहे. पुढील काही दिवस हेच संमिश्र हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही कोरडे हवामान
मराठवाड्यात दिवसा उष्णता, तर रात्री गारवा असे हवामान पाहायला मिळत आहे. कमाल तापमानात फारसा बदल नसला, तरी किमान तापमानात घट होत आहे. पुढील 4 ते 5 दिवस या भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातही पुढील काही दिवस हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. येथे कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. दिवसा उष्ण आणि कोरडे हवामान, तर रात्री काहीसा गारवा जाणवेल.
राज्यात पावसाचा अलर्ट नाही
एकूणच, राज्यात सध्या पावसाचा कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पुढील 4 ते 5 दिवस बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दिवसा जाणवणारी उष्णता आणि रात्री-पहाटे वाढणारा गारवा यामुळे महाराष्ट्रात हळूहळू हिवाळ्याची चाहूल लागली आहे.






