Wednesday, November 11, 2026

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल; दिवसा उन्हाचा चटका, रात्री गारवा, पुढील काही दिवस हवामान कोरडे

उत्तर भारतातील हवामानातील बदलांचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर होत असून, पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather : नोव्हेंबर महिन्यात राज्यातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढत असून, दुपारच्या वेळेत मात्र उन्हाचा चटका कायम आहे. 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतातील हवामानातील बदलांचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर होत असून, पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

कोकणात सध्या दिवसा उष्णता आणि रात्री गारवा असे वातावरण आहे. या भागात कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पुढील 4 ते 5 दिवस कोकणात पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहू शकते.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांची घट झाल्याने रात्री गारवा जाणवू लागला आहे.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असला तरी सकाळी आणि रात्री वातावरण थंड राहत आहे. या भागात कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

विदर्भातही कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 34 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या कोणत्याही विभागासाठी विशेष हवामान अलर्ट नाही. त्यामुळे दिवसा उष्णता आणि रात्री गारवा असे वातावरण पुढील काही दिवस कायम राहू शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >