Thursday, November 12, 2026

Ashish Shelar : 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान राज्यभर 'भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह'; मुंबई उपनगरात 5 लाख वृक्षलागवडीचा संकल्प!

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान 'भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह' आयोजित करण्यात आला असून, आदिवासी विकासाच्या विविध योजनांसह मुंबई उपनगरात 5 लाख वृक्षलागवडीचा संकल्प पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केला आहे.

मुंबई : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिन साजरा होत असून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर 'भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. अनुसूचित जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सप्ताहाचे मुख्य आकर्षण आणि नियोजन

या सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:

  • 13 नोव्हेंबर: न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण, महिला बचत गटांना लाभ आणि नवीन अर्जस्वीकृती.
  • 14 नोव्हेंबर: राज्यभरातील स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव.
  • 15 नोव्हेंबर: भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली. गडचिरोली येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम व संत-महंतांचा सन्मान.
  • 16 नोव्हेंबर: आधारकार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरे.
  • 17 नोव्हेंबर: आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे.
  • 18 नोव्हेंबर: आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन आणि महिला बचत गटांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम.

आदिवासी विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दोन वर्षांत अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. आश्रमशाळांमध्ये पदभरतीवरील निर्बंधामुळे तात्पुरत्या स्वरूपात 3 हजारांहून अधिक कंत्राटी शिक्षकांची व परिचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वीर रघोजी भांगरे यांच्या नावाने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, सर्व जिल्ह्यांत स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण केंद्रे आणि महिलांसाठी 'राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना' सुरू करण्यात आली आहे. तसेच कोलाम, कातकरी, माडिया आणि पारधी या विशेष मागास व स्थलांतरित जमातींच्या उन्नतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई उपनगरात 5 लाख वृक्षलागवडीचा संकल्प

राज्य सरकारच्या पुढील 20 वर्षांत 300 कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 5 लाख वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 12 हजार 390 रोपांची लागवड झाली आहे. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (1 लाख 60 हजार), आरे परिसर (20 हजार), एसआरपीएफ क्षेत्र (5 हजार), आणि एमएमआरडीए क्षेत्र (10 हजार) यांचा समावेश आहे. झाडे जगवण्यासाठी मियावाकी पद्धत आणि जिओ मॅपिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, या मोहिमेत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >