
नवी दिल्ली : आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप आणि वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान लक्षात घेता भारतीय संरक्षण दलांनी आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर पूर्णपणे सज्ज राहावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. शत्रूला अनपेक्षित धक्का देण्याची क्षमता विकसित करण्याबरोबरच ती कायम टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथे आयोजित हवाई दलाच्या कमांडर्स परिषदेत ते बोलत होते. पारंपरिक तसेच नव्या प्रकारच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी गुप्तचर आणि टेहळणी यंत्रणा अधिक सक्षम करणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे आणि संभाव्य धोक्यांचा आधीच अंदाज घेणे गरजेचे असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
शत्रूला सावरण्याची संधी मिळता कामा नये
संरक्षण दलांनी अशा क्षमता आणि कार्यपद्धती विकसित केल्या पाहिजेत की शत्रूला विचार करण्याची किंवा सावरण्याची संधी मिळणार नाही. त्याचवेळी शत्रूच्या अनपेक्षित हालचालींमुळे आपली यंत्रणाही बेसावध राहता कामा नये, असे राजनाथ सिंह म्हणाले. पारंपरिक युद्धपद्धतींसोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करूनही शत्रूला अनपेक्षित धक्का देता येऊ शकतो. त्यासाठी गुप्तचर आणि टेहळणी यंत्रणा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. देशाचे जवान कोणत्याही नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सतर्क, तत्पर आणि सज्ज असले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या आव्हानांसाठी तयारी आवश्यक
आजचे युद्ध केवळ पारंपरिक रणांगणापुरते मर्यादित राहिलेले नाही. क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि अत्याधुनिक शस्त्रप्रणालींच्या वापरामुळे प्रत्यक्ष संपर्काशिवाय लढल्या जाणाऱ्या युद्धाचे महत्त्व वाढत आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले. आत्मघाती ड्रोन, टेहळणी मोहिमा आणि ड्रोनविरोधी कारवाया यांसारख्या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हवाई दलाच्या कमांडर्सनी पूर्णपणे सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
इलेक्ट्रॉनिक युद्ध, सायबर आणि अवकाश क्षेत्रांवर लक्ष
इलेक्ट्रॉनिक युद्ध, सायबर सुरक्षा आणि अवकाश या नव्या क्षेत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानांचा विचार करून भारतीय हवाई दलाने स्वतंत्र कार्यनीती आणि यंत्रणा विकसित कराव्यात, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. या क्षेत्रांतील तयारी अधिक मजबूत केल्यास भविष्यातील युद्ध आव्हानांचा प्रभावीपणे सामना करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हवाई दलाच्या AI ॲप्लिकेशन्सचे लोकार्पण
या परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय हवाई दलाच्या UDAAN (डिजिटायझेशन, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ॲप्लिकेशन नेटवर्किंग) युनिटच्या कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राने विकसित केलेल्या विविध AI ॲप्लिकेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. हवाई दलाच्या सुरक्षित नेटवर्कवर कार्यान्वित करण्यात आलेल्या या ॲप्लिकेशन्समुळे हवाई मोहिमा, प्रशासकीय कामकाज आणि हवाई क्षेत्राच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रक्रिया स्वयंचलित होतील. परिणामी, ही कामे अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पूर्ण करता येणार आहेत.






