Thursday, November 12, 2026

Delhi Museum: सत्तेची केंद्रे आता संस्कृतीचे वैभव मिरवणार! नॉर्थ-साऊथ ब्लॉकमध्ये उभारणार जगातील सर्वात मोठे संग्रहालय

नवी दिल्लीच्या ऐतिहासिक नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इमारती आता एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाल्या आहेत. सरकारी कार्यालये येथून हलवल्यानंतर रायसीना हिलवरील या दोन इमारतींचे रूपांतर 'युगे युगीन भारत संग्रहालय' मध्ये केले जाईल, जे भारताच्या सांस्कृतिक इतिहासाला समर्पित एक भव्य संग्रहालय असेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने ११ नोव्हेंबर २०२६ रोजी ३,२३० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. १,७८,५०९ चौरस मीटरच्या प्रस्तावित बांधकाम क्षेत्रात पसरलेले हे संग्रहालय प्रदर्शन क्षेत्राच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणून नियोजित केले जात आहे.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर या प्रकल्पाबद्दल एक पोस्ट शेअर केली. युगे युगीन भारत संग्रहालयामागील दूरदृष्टीचे वर्णन करताना त्यांनी लिहिले, 'व्यापक दृष्टिकोन ठेवा. संस्कृतीचा विचार करा. 'युगे युगीन भारत संग्रहालया'मागे हीच संकल्पना आहे! आज मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय, ऐतिहासिक 'नॉर्थ ब्लॉक' आणि 'साउथ ब्लॉक' इमारतींचे रूपांतर भारताच्या सभ्यताविषयक प्रवासाचे एक भव्य दर्शन घडवणाऱ्या केंद्रात करण्यासाठी मोठी चालना देईल. प्राचीन ज्ञानप्रणाली, गणित आणि खगोलशास्त्रापासून ते वास्तुकला, कला, भाषा आणि अध्यात्मापर्यंत—हे संग्रहालय आपल्या हजारो वर्षांच्या वारशाचे दर्शन घडवेल; जेथे अभ्यागतांना तल्लीन करून टाकणारे अनुभव आणि जागतिक दर्जाच्या दालनांच्या माध्यमातून हा वारसा जिवंत होईल.'

'जी इमारती एकेकाळी प्रशासनाची केंद्रस्थाने होती, ती आता अशी ठिकाणे बनतील जिथे लाखो लोक आपल्या संस्कृतीच्या कालातीत समृद्धीचा शोध घेऊ शकतील, तिचा अनुभव घेऊ शकतील आणि तिचा उत्सव साजरा करू शकतील. भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी एक ऐतिहासिक नवीन अध्याय!' अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ मे २०२३ रोजी घोषित केलेले युगे युगीन भारत संग्रहालय हे एक राष्ट्रीय संग्रहालय आहे, जे भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचे दस्तऐवज करेल. हा संग्रह या प्रकल्पातील सर्वात मोठ्या पैलूंपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे. संग्रहालयाचा विकास आर्थिक वर्ष २०२६-२७ ते २०३०-३१ दरम्यान टप्प्याटप्प्याने केला जाईल. पहिली गॅलरी २०२६ च्या उत्तरार्धात नॉर्थ ब्लॉकमध्ये जनतेसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित गॅलरी टप्प्याटप्प्याने जोडल्या जातील. तिकीट विक्री, खाद्यपदार्थ, मार्गदर्शित दौरे, कार्यक्रम, स्थळाचे भाडे, डिजिटल अनुभव यांसारख्या गोष्टींमधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >