
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी मंगळवारी झालेल्या दीड तासाच्या चर्चेनंतर बुधवारी तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या गाठीभेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, ही भेट दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी त्यांची चर्चा झाली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनीही बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे मुंडे यांनी सांगितले. या वेळी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देत राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.






