विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहर दिवसेंदिवस रक्तरंजित ठरत आहे. पुण्यातील कोयता गँगची दहशत सगळ्यांनाच माहित आहे. ह्याच कोयता गँगची दहशत पुन्हा पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आळंदी नगर परिषदेच्या हद्दीत आज सकाळी 10:30 सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर दिवसा भरवस्तीत धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
भरवस्तीत दोन हल्लेखोरांनी हातात धारदार शस्त्रे घेऊन संबंधित तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर वार केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
त्यामध्ये दोन तरुण एका तरुणाचा पाठलाग करताना दिसत आहे. पाठलाग करत तरुणावर वार केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास आळंदी नगर परिषद परिसरात घडली असून दोन अज्ञात हल्लेखोरांनी हातात धारदार कोयते आणि शस्त्रे घेऊन एका तरुणाचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या या तरुणाला भरवस्तीत गाठून हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने जीवघेणे वार केले. या हल्ल्याचा थरार पाहून स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
आळंदीसारख्या शांत तसेच अध्यात्मिक भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात सकाळी वर्दळीच्या वेळी अशा प्रकारे कोयत्याने हल्ला होणे हे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करीत आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की इतर कोणत्या कारणातून, याचा शोध घेतला जात आहे.