Friday, November 13, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात ! ट्रकने खासगी बसला 200 मीटर फरफटत नेले अन्... 38 प्रवासी जखमी

जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली ग्रामीण रुग्णालय आणि लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर रत्नागिरी येथे विशेष वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर शुक्रवारी (दि. 13 नोव्हेंबर) पहाटे भरधाव ट्रकने खासगी आराम बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बस महामार्गावर उलटून तब्बल 200 मीटरपर्यंत फरफटत गेली. अपघाताच्या वेळी बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत तब्बल 38 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमका अपघात कसा घडला ?

मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथून प्रवाशांना घेऊन एक खासगी आराम बस मालवणच्या दिशेने जात होती. त्याचवेळी राजस्थानहून महिंद्रा कंपनीच्या वाहनांचे स्पेअर पार्ट्स घेऊन एक ट्रक गोव्याच्या दिशेने निघाला होता. दोन्ही वाहने अंजणारी पुलावर आली असताना ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या आराम बसला मागून दोन वेळा जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की बस महामार्गावर उलटली आणि सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत गेली. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक प्रवासी जखमी झाले, तर काही जण बसमध्येच अडकून पडले. घटनास्थळी प्रवाशांचा आरडाओरडा आणि मदतीसाठी सुरू असलेली धावपळ पाहायला मिळाली.

बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा आणि लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. बस उलटल्यामुळे अनेक प्रवासी आतमध्ये अडकले होते. त्यामुळे रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.

आठ जणांची प्रकृती गंभीर

या भीषण अपघातात एकूण 38 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली ग्रामीण रुग्णालय आणि लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर रत्नागिरी येथे विशेष वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जखमींच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

अंजणारी पुलावर झालेल्या या अपघातामुळे गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातग्रस्त बस आणि ट्रक महामार्गावर आडवे झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पुलावरील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >