Friday, November 13, 2026

PM Modi Bangalore visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बंगळुरू दौरा : १५,६०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण; 'नम्मा मेट्रो'च्या पिंक लाईनचेही उद्घाटन

या दौऱ्यात त्यांच्या हस्ते बंगळुरूकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'नम्मा मेट्रो'च्या (Namma Metro Pink Line) पिंक लाईनचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांनी शहरातील एस-व्यासा (S-VYASA) विद्यापीठात आयोजित 'प्रशांती कुटीरम'च्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्याला (सुवर्णमहोत्सव) हजेरी लावली. एस-व्यासा रजिस्टर्ड सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ लेखक एच. व्ही. शेषाद्री यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी कर्नाटकच्या बंगळुरू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते बंगळुरूकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'नम्मा मेट्रो'च्या (Namma Metro Pink Line) पिंक लाईनचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांनी शहरातील एस-व्यासा (S-VYASA) विद्यापीठात आयोजित 'प्रशांती कुटीरम'च्या ५० व्या वर्धापन दिन सोहळ्याला (सुवर्णमहोत्सव) हजेरी लावली. एस-व्यासा रजिस्टर्ड सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ लेखक एच. व्ही. शेषाद्री यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी बंगळुरूत पोहोचताच कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D.K Shivkumar) आणि राज्यपाल डॉ. सुधा यादव (Sudha Yadav) यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि राज्यपालांचे कर्नाटकात मनःपूर्वक स्वागत असल्याचे म्हटले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते बंगळुरूमधील १५,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन केले जाणार आहे.

बंगळुरू मेट्रोने गाठला १०० किलोमीटरचा ऐतिहासिक टप्पा

पंतप्रधान ज्या 'नम्मा मेट्रो'च्या पिंक लाईनचे उद्घाटन करणार आहेत, त्या उन्नत (जमिनीवरून उंचावर बांधलेल्या) मार्गामुळे बंगळुरूच्या मेट्रो नेटवर्कने पहिल्यांदाच १०० किलोमीटरचा टप्पा ओलांडला आहे. कलेना अग्रहारा ते तवरेकेरे दरम्यानचा हा नवा मार्ग एकूण सहा स्थानकांना जोडतो. यामध्ये कलेना अग्रहारा, हुलीमावू, आयआयएमबी (बिलेकाहल्ली-आयआयएमबी), जेपी नगर चौथा टप्पा, जयदेव रुग्णालय आणि तवरेकेरे या स्थानकांचा समावेश आहे. प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेली अंतिम सुरक्षा तपासणी (CMRS) ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पूर्ण झाली होती, तर २८ ऑक्टोबर रोजी या मार्गाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले होते. या मार्गाचा भूमिगत (अंडरग्राउंड) टप्पा २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पुढील आठवड्यात अंबाजी दर्शन, मंत्रिमंडळ बैठक आणि परदेश दौरा

बंगळुरूचा दौरा आटोपल्यानंतर शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबाजी मंदिरात जाणार आहेत. देशातील ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या मंदिरात ते दर्शन आणि विशेष पूजा करतील. यानंतर येत्या बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिपरिषदेची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचे पुढील धोरण, महत्त्वाची कामे आणि भविष्यातील नियोजनावर चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदी फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे होणाऱ्या 'आसियान' (ASEAN) शिखर परिषदेसाठी रवाना होणार आहेत. या जागतिक परिषदेला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आसियान-अमेरिका विशेष शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >