Friday, November 13, 2026

Baghpat : दिवाळीच्या रात्री राष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षकावर गोळीबार; दोन्ही आरोपी अटकेत, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धीरजच्या पायाला गोळी लागली. तर दुसरा आरोपी मोनू याला पोलिसांनी घेराव घालून पकडले.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बागपत येथे राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकावर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बूढपूर गावातील जंगलात पोलिसांची आरोपींसोबत चकमक झाली. यावेळी मुख्य आरोपी धीरजने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धीरजच्या पायाला गोळी लागली. तर दुसरा आरोपी मोनू याला पोलिसांनी घेराव घालून पकडले. (Uttar Pradesh)

फटाके फोडण्यावरून झाला होता वाद

ही घटना बागपत जिल्ह्यातील रमाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालपूर खडाना गावात घडली. दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. सुरुवातीला किरकोळ बाचाबाची झाली; मात्र काही वेळातच वाद वाढला. ( President House)

याच वादातून धीरज आणि मोनू यांनी राष्ट्रपती भवनात सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या सौरभ तोमर यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळी लागल्याने सौरभ गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरभ हे सुट्टीसाठी आपल्या गावी आले होते आणि कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत होते.

बूढपूरच्या जंगलात पोलिसांची चकमक

गोळीबाराच्या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती. दरम्यान, धीरज आणि मोनू बूढपूर गावातील जंगलात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जंगलात घेराव घातला.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वतःला घेरल्याचे लक्षात येताच धीरजने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धीरजच्या पायाला गोळी लागली. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरा आरोपी मोनू यालाही पोलिसांनी अटक केली.

बागपतच्या पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

बागपतचे पोलीस अधीक्षक पूर्णेंदू सिंह यांनी चकमकीच्या घटनेला दुजोरा दिला. मुख्य आरोपी धीरज जखमी झाला असून दुसऱ्या आरोपीला घेराव घालून अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >