Friday, November 13, 2026

तेलंगणात प्रशिक्षणादरम्यान लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडावर आदळला, 8 जवान जखमी

तेलंगणातील चेवेल्ला येथे शुक्रवारी सकाळी चालक प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी जवानाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जवान किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर गोलकोंडा येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेवेल्ला : तेलंगणातील चेवेल्ला परिसरात शुक्रवारी सकाळी भारतीय लष्कराच्या ट्रकचा एक भीषण अपघात घडला. चालक प्रशिक्षणादरम्यान (Driver Training) एका प्रशिक्षणार्थी जवानाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटल्याने हा अपघात झाला. भरधाव ट्रकने प्रथम रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन तो आदळला. या अपघातात ट्रकमध्ये प्रवास करणारे आठ जवान किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

चेवेल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास 14 जवानांना घेऊन लष्कराचा हा ट्रक गोलकोंडा येथील आर्मी कॅम्पमधून शाबादच्या दिशेने रवाना झाला होता. नियमित चालक प्रशिक्षणाचा भाग म्हणून जवान या ट्रकमधून प्रवास करत होते. ट्रक चेवेल्ला येथील अल्लावाडा परिसरात आला असता, वाहन चालविण्याची जबाबदारी एका प्रशिक्षणार्थी जवानाकडे होती. याच दरम्यान अचानक त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले.

नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक वेगाने रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकला. धडक इतकी जोरदार होती की ट्रक रस्त्याच्या कडेला सरकला आणि एका मोठ्या झाडावर जाऊन आदळला. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रकमधील 14 जवानांपैकी आठ जवानांना या अपघातात किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि लष्कराचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमी जवानांना तात्काळ पुढील उपचारासाठी गोलकोंडा येथील लष्करी रुग्णालयात (Military Hospital) दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या संपूर्ण घटनेबाबत चेवेल्लाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) बी. किशन यांनी अधिकृत माहिती दिली. दरम्यान, हा अपघात प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक किंवा मानवी चुकीमुळे घडला असून, या प्रकरणी लष्कराकडून किंवा इतर कोणाकडूनही अद्याप पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे चेवेल्ला पोलीस ठाण्यात अद्याप या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >