Friday, November 13, 2026

ठाणे हादरले! पहाटे उथळसर परिसरात प्रसिद्ध बार अँड रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; घटनेत सुदैवाने जिवितहानी नाही!

ठाणे पश्चिमेतील उथळसर परिसरामध्ये आगीची भीषण घटना घडली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास 'माया बार अँड रेस्टॉरंट'मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे रेस्टॉरंटमधील फर्निचरसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीही मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

ठाणे: ठाणे शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी, 13 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटेच्या सुमारास ठाणे पश्चिमेतील उथळसर परिसरातील एका प्रसिद्ध बार आणि रेस्टॉरंटमध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. परिसरामध्ये लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेमध्ये रेस्टॉरंटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, उथळसर नाक्यावरील नांदगावकर हाईट्स शेजारी आणि उथळसर प्रभाग समिती कार्यालयाजवळ 'माया बार अँड रेस्टॉरंट' नावाचं एक प्रसिद्ध बार रॅस्टॉरंट आहे. हे हॉटेल ग्राऊंड प्लस वन (Ground + 1) अशी बांधकाम असलेली इमारत आहे. आज पहाटे 05.42 वाजण्याच्या सुमारास या बार आणि रेस्टॉरंटमधून अचानक धूर आणि आगीचे लोट बाहेर येऊ लागले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच क्षेत्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष (RDMC) आणि मुख्य अग्निशामक नियंत्रण कक्षाला तातडीने घटनास्थळी बोलवून घेतले. अवघ्या काही मिनिटांतच अग्निशामक दल, दोन बंब, एक रेस्क्यू वाहन, आरडीएमसीचे पथक आणि राबोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आग पसरण्यापूर्वीच नियंत्रण मिळवण्यात यश आले. सकाळी 06.20 वाजेच्या सुमारास, म्हणजेच अवघ्या चाळीस मिनिटांत ही आग पूर्णपणे आटोक्यात आली. या भीषण आगीमध्ये रेस्टॉरंटच्या तळमजल्यावर असलेले काउंटर, रेफ्रिजरेटर (फ्रिज), टेबल्स, खुर्च्या, टीव्ही आणि इतर महत्त्वाचे व्यावसायिक साहित्य जळून खाक झाले आहे. आगीच्या तीव्रतेमुळे रेस्टॉरंटमधील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही घटना पहाटेच्या वेळी घडल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये ग्राहक किंवा कर्मचारी नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा कोणाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

आगीची घटना जर दिवसा घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. ठाणे पोलीसांकडून आणि ठाणे अग्निशामक दलाकडून आगीच्या घटनेबद्दल सखोल आणि सविस्तर माहिती घेतली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा