
OpenAI : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे दैनंदिन जीवनापासून ते ऑफिसमधील कामांपर्यंत अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मात्र, याच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. AI च्या मदतीने होणारे सायबर हल्ले आणि डिजिटल फसवणुकीचे वाढते धोके लक्षात घेता आता OpenAI ने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने दोन नवीन सिक्युरिटी टूल्स सादर केले असून, त्यांच्या मदतीने सॉफ्टवेअरमधील सुरक्षा त्रुटी शोधणे आणि त्या दूर करणे अधिक सोपे होणार आहे.
OpenAI ने आपल्या Daybreak Security Platform अंतर्गत Daybreak Red Team आणि Daybreak Defense Factory ही दोन नवीन टूल्स सादर केली आहेत. या दोन्ही टूल्सची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. पहिले टूल सॉफ्टवेअरमधील संभाव्य सुरक्षा कमकुवत बाजू शोधण्याचे काम करेल, तर दुसरे टूल त्या त्रुटी दूर करण्यासाठी डेव्हलपर्सना आवश्यक बदल सुचवण्यास मदत करेल. कंपनीच्या मते, भविष्यात सायबर हल्ल्यांचे स्वरूप अधिक गंभीर होऊ शकते. हॅकर्सदेखील AI सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या डिजिटल सुरक्षेला अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.
Daybreak Red Team कसे काम करणार ?
OpenAI चे Daybreak Red Team हे सॉफ्टवेअर आणि वेब अॅप्लिकेशनची सुरक्षा तपासण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. हे टूल सॉफ्टवेअरचा सोर्स कोड आणि त्यासंबंधित माहितीचे विश्लेषण करून त्यातील संभाव्य सुरक्षा त्रुटी शोधू शकते. या प्रक्रियेत अनेक डिजिटल AI एजंट एक टीम म्हणून काम करतात. हे एजंट सॉफ्टवेअरमधील कमकुवत बाजू शोधण्यासोबतच संभाव्य सायबर हल्ल्यांमुळे कोणत्या भागाला किती धोका निर्माण होऊ शकतो, याचेही विश्लेषण करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे टूल एखाद्या कंपनीसाठी डिजिटल सिक्युरिटी टीमप्रमाणे काम करेल.
विशेष म्हणजे, बाहेरून सायबर हल्ला होण्याची वाट न पाहता कंपन्यांना आपल्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी आधीच शोधता येतील. या टूलच्या माध्यमातून आधीपासून वापरात असलेले कोड स्कॅनर, बग बाऊंटी प्रोग्राम आणि सुरक्षा अहवाल यांचीही तपासणी करता येईल. एखाद्या अहवालात नमूद केलेली सुरक्षा त्रुटी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की नाही, हे पडताळण्यासही मदत होईल. एखादी त्रुटी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा तपासणी करून ती समस्या पूर्णपणे दूर झाली आहे की नाही, हेही समजू शकते. सध्या हे टूल सुरुवातीच्या अॅक्सेस प्रोग्रामअंतर्गत उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच, कोणत्या अॅप्लिकेशन आणि नेटवर्क अॅड्रेसची तपासणी करायची, यावरही कंपनी नियंत्रण ठेवू शकते.
Apple oxidation process : सफरचंद हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. घरात कोणी आजारी असेल किंवा कोणत्या आजारी व्यक्तीला बघायला जातो तेव्हा हमखास आपण फळांमध्ये सफरचंद घेऊन ...
Daybreak Defense Factory कशासाठी उपयोगी ?
OpenAI चे दुसरे टूल म्हणजे Daybreak Defense Factory. हे टूल सॉफ्टवेअरमधील सुरक्षा त्रुटी शोधल्यानंतर त्या दूर करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. हे टूल कंपनीच्या कोडचे विश्लेषण करून त्रुटी निर्माण होण्यामागील कारण शोधण्यास मदत करेल. त्यानंतर संबंधित समस्या दूर करण्यासाठी आवश्यक बदल आणि सुधारणा सुचवेल. उदाहरणार्थ, एखाद्या सिक्युरिटी स्कॅनमध्ये अॅपमध्ये काही त्रुटी आढळल्यास, त्या समस्येचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी आवश्यक कोडमधील बदल सुचवण्यासाठी या टूलची मदत घेता येईल.
यानंतर डेव्हलपर्स हे बदल तपासतील. बदल योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर ते सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करता येतील. तसेच, नवीन कोडची तपासणी करणे किंवा ठराविक वेळेनंतर सिक्युरिटी स्कॅन सुरू करणे यासाठीही हे टूल वापरता येऊ शकते. विशेष म्हणजे, इतर सिक्युरिटी टूल्सकडून मिळालेल्या अहवालांचे विश्लेषण करून त्यानुसार सुधारणा सुचवण्याची क्षमताही यामध्ये आहे.
AI मुळे सायबर सुरक्षेला मिळणार नवी ताकद
AI तंत्रज्ञानाचा वापर जसजसा वाढत आहे, तसतसे सायबर सुरक्षेची आव्हानेही वाढत आहेत. अशा परिस्थितीत OpenAI ची ही दोन नवीन टूल्स कंपन्यांना आपल्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी वेळेत शोधण्यासाठी आणि त्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.एकीकडे Daybreak Red Team सुरक्षा त्रुटी शोधण्यास मदत करेल, तर दुसरीकडे Daybreak Defense Factory त्या त्रुटींवर उपाय सुचवण्याचे काम करेल. त्यामुळे भविष्यात सॉफ्टवेअर सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी AI ची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.






