
Apple oxidation process : सफरचंद हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. घरात कोणी आजारी असेल किंवा कोणत्या आजारी व्यक्तीला बघायला जातो तेव्हा हमखास आपण फळांमध्ये सफरचंद घेऊन जातो. परंतु सफरचंद कापल्यानंतर काही वेळातच त्याचा रंग तपकिरी किंवा काळसर होतो, हे तर सर्वांना माहिती आहे. पण यामागचं कारण काय असतं?
सफरचंद कापल्यानंतर लालबुंद आणि ताजे दिसणारे हे फळ काही वेळ उघड्यावर ठेवल्यास त्याचा रंग बदलू लागतो. सुरुवातीला पांढरा दिसणारा गर हळूहळू तपकिरी किंवा काळसर दिसू लागतो. अनेकवेळा सफरचंद खराब झाले की काय, असा प्रश्नही पडतो. पण, या रंगबदलाचा फळ खराब होण्याशी काहीही संबंध नसतो. सफरचंदातील नैसर्गिक घटक आणि हवेतला ऑक्सिजन यांच्यात होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे ही प्रक्रिया घडते. पण हे कापलेले सफरचंद खाणे सुरक्षित आहे का, जाणून घेऊया.
सफरचंदाचा रंग बदलण्यामागे काय कारण आहे?
सफरचंदाच्या पेशींमध्ये पॉलीफेनॉल नावाचे संयुग आणि पॉलीफेनॉल ऑक्सिडेज नावाचे विकर असते. सफरचंद जेव्हा पूर्ण म्हणजे अखंड असते तेव्हा त्याच्या पेशींची रचना व्यवस्थित असल्यामुळे हे दोन्ही घटक एकमेकांपासून वेगळे राहतात. त्यामुळे फळाचा गर त्याच्या मूळ रंगात टिकून राहतो. मात्र, सफरचंद कापले किंवा त्याला इजा झाली की पेशींची रचना मोडते. परिणामी, पॉलीफेनॉल आणि पॉलीफेनॉल ऑक्सिडेज यांचा हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क येतो. त्यानंतर ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते आणि सफरचंदाच्या गराचा रंग बदलू लागतो.
Diljit Dosanjh Ahmedabad Concert 2026: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. परंतु लाईव्ह ...
कापलेल्या सफरचंदाचा तपकिरी रंग कसा तयार होतो?
सफरचंद कापल्यानंतर त्यातील पॉलीफेनॉल ऑक्सिडेज हे विकर पॉलीफेनॉलचे ऑक्सिडेशन करते. या रासायनिक प्रक्रियेत क्विनोन्स नावाचे पदार्थ तयार होतात. पुढे हे क्विनोन्स एकमेकांशी अभिक्रिया करून तपकिरी रंगाची संयुगे तयार करतात. याचमुळे काही वेळ उघड्यावर ठेवलेल्या सफरचंदाचा आतील पांढरा भाग तपकिरी किंवा काळसर दिसू लागतो. या प्रक्रियेला एन्झायमॅटिक ब्राउनिंग असे म्हणतात. ही फक्त सफरचंदातच घडणारी प्रक्रिया नसून काही इतर फळे आणि भाज्यांमध्येही दिसून येते.
रंग बदललेले सफरचंद खाणे सुरक्षित आहे का?
सफरचंदाचा रंग बदलला म्हणजे ते खराब झाले, असा अर्थ होत नाही. ऑक्सिडेशनमुळे गराचा रंग तपकिरी होतो. या कारणामुळे ते खाण्यास अयोग्य ठरत नाही. त्यामुळे कापल्यानंतर रंग बदललेले सफरचंद खाता येते. मात्र, कापलेले फळ जास्त वेळ उघड्यावर ठेवणे टाळावे. कारण वेळ जसजसा वाढतो, तसतसा ऑक्सिडेशनचा परिणाम अधिक स्पष्ट होतो आणि गराचा रंग आणखी गडद होऊ शकतो. फळाचा वास, पोत किंवा इतर खराब होण्याची चिन्हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
सफरचंद काळं पडू नये म्हणून काय करावे?
कापलेल्या सफरचंदाचा रंग जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी सफरचंदाच्या कापलेल्या भागावर थोडा लिंबाचा रस लावावा. तसेच सफरचंदाच्या कापलेल्या फोडी पाण्यात ठेवल्यास त्यांचा हवेशी थेट संपर्क कमी होतो. त्यामुळे रंग बदलण्याचा वेग कमी होऊ शकतो.





