आजवर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (AI) तंत्रज्ञानाचे अनेक तांत्रिक आणि व्यावसायिक चमत्कार पाहिले आहेत. मात्र, हेच आधुनिक तंत्रज्ञान जेव्हा मानवी संवेदनांशी जोडले जाते, तेव्हा एखाद्या विस्कटलेल्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याचे पुण्यकर्मही घडू शकते. याचाच एक हृदयस्पर्शी प्रत्यय नुकताच आला असून, तब्बल अडीच वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबापासून दुरावलेल्या ४५ वर्षीय झुलेखा मुखिद शेख यांचा शोध घेण्यात एआय आणि गुगल सर्चला मोठे यश आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्यकर्त्यांची चिकाटी यांमुळे एका निराधार महिलेला तिचे हक्काचे घर आणि आपली माणसे पुन्हा मिळाली आहेत.
Barpeta artisans Ramayana armor : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाशी आसामचे खास कनेक्शन; बार्पेेटाच्या कुशल कारागिरांनी साकारले अभिनेत्यासाठी खास चिलखत!
दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर बहुचर्चित 'रामायण' (Ramayan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर ...
या संपूर्ण घटनेची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी झाली होती, जेव्हा मानसिक त्रासामुळे झुलेखा शेख राहत्या घरातून निघून गेल्या होत्या. भटकंती करत त्या मुंबईत पोहोचल्या होत्या. ३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईतील कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच कुलाबा पोलीस आणि चेंबूर येथील महिला भिक्षुकगृहाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांदूर येथील 'संविता आश्रमात' दाखल करण्यात आले. आश्रमात राहणाऱ्या झुलेखा यांना त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचवण्याचा विडा 'जीवन आनंद संस्थेचे' विश्वस्त किसन चौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचलला.
सुरुवातीला झुलेखा यांच्याकडून त्यांच्या गावाची किंवा नातेवाईकांची ठोस माहिती मिळणे कठीण होते. परंतु, संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हार न मानता त्यांच्याशी अत्यंत संयमाने आणि प्रेमाने नियमित संवाद साधण्यास सुरुवात केली. या संवादातून त्यांच्या भूतकाळातील आणि गावाकडील काही तुटक संदर्भ समोर आले. नेमक्या याच माहितीचा धागा पकडून कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीसोबतच गुगल सर्च आणि चॅटजीपीटी (ChatGPT) यांसारख्या प्रगत एआय साधनांची मदत घेतली. एआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे अचूक विश्लेषण करत कार्यकर्त्यांनी अखेर झुलेखा यांचे मूळ गाव आणि परभणीत राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचा पत्ता शोधून काढला.
मूळ गावचा शोध लागल्यानंतर परभणीतील 'निर्भया पोलीस पथकाच्या' सहकार्याने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. प्राथमिक ओळख पटल्यानंतर जेव्हा झुलेखा यांचे त्यांच्या कुटुंबीयांशी फोनवर संभाषण घडवून आणले गेले, तेव्हा दोन्हीकडच्या भावनांचा बांध फुटला. अखेर प्रतीक्षेचे हे अडीच वर्षांचे पर्व संपले आणि झुलेखा यांचे पती स्वतः सिंधुदुर्गातील आश्रमात दाखल झाले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी आपल्या पत्नीला मोठ्या आनंदाने पुन्हा घरी नेले. मानवी आपुलकी आणि एआय तंत्रज्ञानाच्या योग्य वापरामुळे घडलेली ही पुनर्भेट सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.