Saturday, November 14, 2026

महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप घोटाळाच्या CBI- ED च्या कारवाईत धक्कादायक खुलासे; घोटाळ्याची रक्कम 92,000 कोटींवर!

महादेव ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या चौकशीनंतर सीबीआयने ६ राज्यांत ३३ ठिकाणी धाडी टाकत अनेक लाईव्ह बेटिंग पॅनेल्स उद्ध्वस्त केली आहेत. ईडीच्या मते, या बेकायदेशीर बेटिंग घोटाळ्याचा आकडा वाढून 92,000 कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, दुबईतून हे रॅकेट कसे चालवले जात होते याचा मोठा खुलासा झाला आहे.

मुंबई: 'महादेव ऑनलाइन बुक' बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) देशभरातली सहा राज्यांत तब्बल 33 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी सौरभ चंद्राकर याने कोठडीतील चौकशीदरम्यान दिलेल्या खळबळजनक माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली आहे. अवैध बेटिंगमधून जमा होणाऱ्या काळ्या पैशांची वाहतूक, त्याचे कलेक्शन आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारे पॅनल ऑपरेटर्स, मध्यस्थ, हवाला ऑपरेटर्स आणि आंगडिया यांच्या ठिकाणांना सीबीआयने या मोहिमेत प्रामुख्याने लक्ष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या व्यापक शोधमोहिमेत महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरमध्ये, दिल्ली, अमृतसर, राजस्थानमधील धोलपूर, भोपाळ, रायपूर, दुर्ग, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान सीबीआयच्या पथकाने अनेक ठिकाणी थेट सुरू असलेले बेटिंग आणि जुगाराचे पॅनल्स उद्ध्वस्त केले आहेत. या छाप्यांत मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. भाड्याने घेतलेल्या किंवा इतरांच्या नावावर उघडलेल्या बँक खात्यांद्वारे (म्यूल अकाउंट्स) आणि हवाला मार्गाने ही कोट्यवधींची अवैध रक्कम परदेशात पाठवली जात असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनात आले होते. जप्त केलेल्या पुराव्यांची CBI कडून तांत्रिक तपासणी केली जात आहे.

सौरभ चंद्राकरच्या सखोल चौकशीतून या ॲपचे देशव्यापी जाळे आणि कार्यपद्धती पूर्णपणे उघड झाली आहे. तपासादरम्यान गोळा केलेले डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे समोर ठेवून त्याची कसून चौकशी करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) या प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यालय असून, तिथून भारतातील पॅनल ऑपरेटर्सच्या मोठ्या साखळीमार्फत हा अवैध व्यवसाय चालवला जात होता. हे स्थानिक ऑपरेटर्स ग्राहकांचे नवीन आयडी तयार करून बेटिंगचे पैसे गोळा करत आणि नंतर हवाला चॅनेलद्वारे ते परदेशात पाठवत असत, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी चंद्राकरच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज सादर करताना अत्यंत धक्कादायक माहिती उघड केली.

ऑक्टोबर 2023 मध्ये पहिले आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही सप्टेंबर 2026 मध्ये पाचवे पुरवणी आरोपपत्र दाखल होईपर्यंत हे बेटिंग अ‍ॅप कोणताही अडथळा न येता सुरूच होते, असा गंभीर दावा ईडीने केला आहे. जुलै 2025 मध्ये पीएमएलए कायद्याच्या कलम 50 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात सह- आरोपी रजत कुमार सिंग आणि विशाल रमाणी यांनी दुबईतून अनुक्रमे 8 ते 10 आणि सुमारे 35 बेटिंग पॅनल्स स्वतंत्रपणे चालवत असल्याची कबुली दिली आहे. तपासाच्या सुरुवातीला या गुन्ह्यातील रक्कम सुमारे 10 ते 11 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज होता, मात्र गेल्या तीन वर्षांत त्यात तब्बल नऊ पटीने वाढ होऊन ती आता 92,000 कोटी रुपयांवर पोहोचल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. जुलै 2025 मधील एका छाप्यादरम्यान सह- आरोपी रजत सिंगला चंद्राकरच्या मोबाईल नंबरवरून सतत फोन येत असल्याचेही समोर आले होते.

चंद्राकरच्या मोबाईल नंबरचा वापर करणारी व्यक्ती आणि संपूर्ण मनी ट्रेल उघड करण्यासाठी चंद्राकरची कोठडी आवश्यक असल्याचे ईडीने स्पष्ट केले. न्यायालयाने चंद्राकरला 19 नोव्हेंबरपर्यंत सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली असून, परदेशातील साथीदार, यात सामील असलेले सरकारी कर्मचारी आणि फरार आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी दोन्ही यंत्रणा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >