
मुंबई : प्रवाशांना, विशेषतः महिला प्रवाशांना अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील यशस्वी उपक्रमानंतर आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ‘डीमार्ट फाउंडेशन’सोबत भागीदारी करत ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकांवर सुधारित स्वच्छता सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत या दोन्ही स्थानकांवरील प्रसाधनगृहांचे नूतनीकरण आणि पुढील 5 वर्षे देखभाल करण्यासाठी मध्य रेल्वे आणि डीमार्ट फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
ठाणे स्थानकावर अत्याधुनिक सुविधा; 24 तास स्वच्छता कर्मचारी तैनात
या उपक्रमांतर्गत ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 (कल्याण दिशेकडील) येथील महिलांच्या प्रसाधनगृहाचे आणि पुरुषांच्या मूत्रालयाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी या सुविधा प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्या. महिलांच्या प्रसाधनगृहात एकूण 4 युनिट्स असून, त्यापैकी 3 भारतीय आणि 1 पाश्चात्य शैलीतील आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधेचाही समावेश आहे. पुरुषांच्या विभागात 11 मूत्रालये आणि 3 भारतीय शैलीतील प्रसाधनगृहे तयार करण्यात आली आहेत. दुर्गंधी टाळण्यासाठी येथे प्रभावी एक्झॉस्ट सिस्टीम बसवण्यात आली आहे. तसेच स्वच्छता आणि देखभालीसाठी 24 तास 6 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ठाणे स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. या नूतनीकरणामुळे प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता सुधारित स्वच्छता सुविधा वापरता येणार आहेत. सध्या या स्थानकावर एकूण 40 मूत्रालये, 10 प्रसाधनगृहे, 17 वॉश बेसिन, दिव्यांग व्यक्तींसाठी 2 आणि महिलांसाठी 14 प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असून या नुतनीकरणाच्या पुनर्बांधकामामध्ये ...
कल्याण स्थानकावरही सुधारित स्वच्छता सुविधा
दुसरीकडे, महत्त्वाच्या ‘एनएसजी-1’ श्रेणीतील कल्याण रेल्वे स्थानकावरही प्रवाशांसाठी अशाच प्रकारच्या सुधारित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3 (कसारा दिशेकडील) आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 6/7 (कर्जत दिशेकडील) येथील 2 मोठ्या प्रसाधनगृहांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ही प्रसाधनगृहे 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. महिलांच्या विभागात 9 प्रसाधनगृहांची सुविधा असून, त्यात दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सुविधांचाही समावेश आहे. पुरुषांच्या विभागात 9 मूत्रालये आणि 4 भारतीय शैलीतील प्रसाधनगृहे तयार करण्यात आली आहेत. या संपूर्ण परिसराची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी 24 तास 19 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सात फलाटांचे हे महत्त्वाचे स्थानक आता उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहे.
प्रवाशांकडून उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद
डीमार्ट फाउंडेशनतर्फे दोन्ही स्थानकांवर स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आल्यामुळे स्वच्छता आणि देखभालीवर सातत्याने लक्ष दिले जात आहे. या उपक्रमाला रेल्वे प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबतच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने डीमार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने सीएसएमटी, भायखळा आणि घाटकोपर स्थानकांवरही असे प्रकल्प राबवले आहेत. ही भागीदारी प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, स्वच्छ आणि आरोग्यदायी करण्यासाठी मध्य रेल्वेची कटिबद्धता दर्शवते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुधारित सुविधांचा लाभ घेण्याचे आणि स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.





