Saturday, November 14, 2026

सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कार दुभाजकाला आदळून भीषण आग, आगीत कार चालकाचा मृत्यू

नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर नेरुळजीवळील एल.पी. उड्डाणपुलाजवळ एक भीषण कार अपघात झाला आहे. रस्ता दुभाजकाला धडकून कारने पेट घेतल्यामुळे झालेल्या या दुर्घटनेत 29 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिची मैत्रीण थोडक्यात बचावली आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावर अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा कार अपघात झाला आहे. रस्ता दुभाजकाला धडकुन कारने पेट घेतला आहे. सायन- पनवेल महामार्गावरील बर्निंग कारचा थराराचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. भरधाव कार थेट रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या दुभाजकावर (Road Divider) जाऊन आदळली. रस्ता दुभाजकाला कार धडकल्यानंतर अवघ्या काही वेळातच कारने पेट घेतला. या दुर्घटनेत कार चालवणाऱ्या 29 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, तिच्यासोबत असलेली मैत्रीण सुदैवाने या भीषण आगीतून थोडक्यात बचावली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात नवी मुंबईतील नेरुळ परिसरातील एल. पी. उड्डाणपुलाजवळ (LP Flyover) घडला. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तन्वी अमरजीत भल्ला ही तरुणी तिच्या एका मैत्रिणीसोबत मुंबईहून खारघरच्या दिशेने कारमधून प्रवास करत होती. प्रवास सुरू असताना जेव्हा त्यांची कार नेरुळ येथील उड्डाणपुलाजवळ पोहोचली, तेव्हा अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार थेट रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरात आणि भीषण होती की, कार ड्रायव्हर तन्वी गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या धाडसी नागरिकांनी आणि स्थानिकांनी तातडीने पुढे येत जखमी तन्वीला उपचारासाठी जवळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दुभाजकावर झालेल्या या भीषण धडकेमुळे आणखी एक भयानक दुर्घटना घडली. धडक बसलेली कार काही क्षणांतच पेट घेतली आणि पाहता पाहता आगीने संपूर्ण कारला आपल्या कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन केंद्राचे (Nerul Fire Station) जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार, एल.पी. उड्डाणपुलावरून पुढे जायचे की खालच्या सर्व्हिस रोडने पुढे जायचे, याबाबत त्या कार चालकाच्या मनामध्ये संभ्रम किंवा गोंधळ उडाला असावा, त्यामुळे हा अपघात घडला असावा. पोलिसांकडून ड्रायव्हरच्या मैत्रिणीकडूनही घटनेची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेरुळ पोलीस ठाण्याचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >