
मेरठ : क्रांतीची भूमी असलेल्या मेरठमध्ये आयोजित 'माजी सैनिक पुनर्मिलन सोहळ्यात' उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) यांनी राज्यातील ५.१९ लाख माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मागील सरकारांवर कडक शब्दांत ताशेरे ओढताना ते म्हणाले की, जुन्या सत्ताधाऱ्यांनी दशकानुदशके 'वन रैंक-वन पेंशन' (OROP) योजना प्रलंबित ठेवली होती. सैनिक आणि त्यांच्या शहिद कुटुंबीयांचा सन्मान करणे कधीही त्यांच्या प्राधान्यक्रमात नव्हते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'नवा भारत' सैनिकांचा मान-सन्मान आणि त्यांचे सामर्थ्य यांना नेहमी सर्वोच्च स्थान देत आहे.
सुरक्षित वातावरणातच देशाची खरी प्रगती शक्य
सैनिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगी पुढे म्हणाले की, कोणताही देश वा समाज तेव्हाच प्रगती पथावर जाऊ शकतो, जेव्हा तिथे सुरक्षित वातावरण असेल. सुरक्षेचे कवच नसेल, तर प्रगतीचे रूपांतर अधोगतीत व्हायला वेळ लागत नाही. सियाचीनमधील हाडे गोठवणारी थंडी असो किंवा राजस्थानचे तप्त वाळवंट, देशाचा जवान प्रत्येक कठीण मोर्च्यावर खंबीरपणे उभा असतो. सैनिक कधीही सेवानिवृत्त होत नाही, फक्त त्याची वर्दी बदलते; निवृत्तीनंतरही तो गाव आणि समाजाचा खरा मार्गदर्शक बनून कायम प्रेरणा देत राहतो.
स्टँप ड्युटीत सूट आणि शौर्य पुरस्काराची रक्कम दुप्पट
या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी माजी सैनिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आता ५० लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेच्या खरेदीवर स्टँप ड्युटीमध्ये (मुद्रांक शुल्क) पूर्ण सूट दिली जाईल. यापूर्वी ही मर्यादा केवळ २० लाख रुपयांपर्यंत होती. याशिवाय, शौर्य पुरस्कार विजेत्या शूर जवानांना मिळणारी रोख रक्कम देखील दुप्पट केली जाईल, असा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला.
उत्तर प्रदेशची वीरभूमी आणि गाझीपूरच्या 'गहमर' गावाची गाथा
उत्तर प्रदेश ही शूरवीरांची पवित्र भूमी असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री म्हणाले की, या राज्यात सुमारे २० लाख लोकांचे सैनिकी कुटुंब राहते. देशात दरवर्षी निवृत्त होणाऱ्या ६० हजार सैनिकांपैकी सुमारे १२ हजार जवान एकट्या उत्तर प्रदेशातील असतात. या मातीने जगन्नाथ सिंह, वीर अब्दुल हमीद, कॅप्टन मनोज पांडे आणि योगेंद्र सिंह यादव यांसारखे महान सुपुत्र देशाला दिले आहेत. बुलंदशहर आणि गाझीपूरमध्ये अनेक कुटुंबे अशी आहेत, जिथे आजोबा, वडील आणि त्यानंतर मुले-मुली अशा तीन-तीन पिढ्या देशसेवेसाठी वर्दी परिधान करत आहेत. विशेषतः, गाझीपूरचे 'गहमर' गाव तर देशाला सर्वाधिक जवान देणारे गाव म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. भारतमातेच्या या सर्व वीर सुपुत्रांच्या बलिदानाला त्यांनी कोटी-कोटी वंदन केले.
आजवर आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय (AI) तंत्रज्ञानाचे अनेक तांत्रिक आणि व्यावसायिक चमत्कार पाहिले आहेत. मात्र, हेच आधुनिक तंत्रज्ञान जेव्हा ...
मेरठचा बदललेला चेहरा आणि विकासाची नवी भरारी
मेरठच्या गतकाळावर आणि वर्तमान स्थितीवर प्रकाश टाकताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, या शहराने नेहमीच आस्था आणि क्रांतीचा सुवर्णसंगम घडवला आहे. एकेकाळी मेरठची ओळख बेकायदेशीर वाहनांची तोडफोड आणि माफियांच्या दहशतीमुळे झाली होती. ऊस उत्पादक शेतकरी आपल्याच कष्टाच्या पैशांसाठी वणवण भटकयचे आणि त्यांच्यावर पोलिसांच्या लाठ्या चालवल्या जायच्या. साखर कारखान्यांना टाले लागले होते, खतांसाठी लांबच लांब रांगा लागायच्या आणि शेतकरी आपल्या शेतात जायलाही घाबरायचे.
मात्र, आज हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. 'एक जिल्हा, एक उत्पादन' (ODOP) योजनेमुळे मेरठ आपली नवी ओळख जागतिक स्तरावर निर्माण करत आहे. ऊस शेतकऱ्यांना आता विक्रमी आणि वेळेवर पेमेंट मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला नमो भारत, आरआरटीएस कॉरिडॉर आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेमुळे प्रवास अतिशय सुकर झाला आहे. तसेच, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ मेरठमध्ये एक भव्य स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी देखील आकारास येत आहे.
मागील सरकारांच्या काळात गुन्हेगारी शिखरावर
मागील काळातील अप्रिय घटनांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१६ मध्ये कारगिल युद्धातील एका माजी सैनिकाला केवळ 'सलाम' करण्यास नकार दिल्यामुळे एका राजकीय पक्षाच्या समर्थकांनी मारहाण केली होती, हे अत्यंत दुर्दैवी होते. २०१३ मध्ये सीमेवर शहीद झालेल्या जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी व सन्मानासाठी साधी प्रशासकीय व्यवस्थाही तेथील सरकारला करता आली नव्हती. राज्यात गुन्हेगारी डोके वर काढून होती आणि छेडछाडीला विरोध करणाऱ्या मुलीची हत्या करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली होती.
'मोदी सरकारने दहशतवाद्यांची मस्ती जिरवली'
पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या मनात सैनिकांबद्दल अजिबात आदर नव्हता आणि देशाच्या सुरक्षेशी नेहमी तडजोड केली जायची, असा गंभीर आरोप योगी यांनी केला. तेव्हा जवानांच्या पराक्रमावर आणि शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असे. सीमेवर कोणताही दहशतवादी हल्ला झाला, की तत्कालीन सरकार फक्त कागदी घोडे नाचवत 'डोजियर' पाठवून आपले कर्तव्य संपल्याचे मानायचे. परंतु, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली देशाने दहशतवाद्यांची आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांची मस्ती पूर्णपणे जिरवली आहे. देशाचे संरक्षण बजेट कैक पटीने वाढले आहे, लष्कराच्या सोयीसाठी 'चीफ ऑफ डिफेंस स्टाफ' (CDS) पदाची निर्मिती केली गेली आहे. देशाचे पंतप्रधान स्वतः सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. आज भारताची संरक्षण सामग्रीची निर्यात ५५ पटीने वाढली असून, पाकिस्तानला धडकी भरवणारी 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्रे आता आपल्या उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात तयार होत आहेत.
कलम ३७० रद्द करून 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चा संकल्प मजबूत
केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील कलम ३७० हटवून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हा दृढ संकल्प प्रत्यक्षात आणला आहे. डबल इंजिन सरकारने शहिदांच्या वारसांना मिळणारी आर्थिक मदत २० लाखांवरून थेट ५० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. शिवाय, २०१८ पासून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्याची तरतूद लागू करण्यात आली आहे, तसेच वीरगती प्राप्त शूरवीरांच्या नावे भव्य स्मारके आणि स्मृतिद्वार उभारले जात आहेत. सैनिकांनी नेहमीच आपल्या प्राणांपेक्षाही राष्ट्राला सर्वोच्च स्थान दिले आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी उपस्थितांना देशसेवेची प्रेरणा दिली.






