Saturday, November 14, 2026

Nashik Crime : नाशिकमध्ये चोराचा पोलिसांशी थरार ! पोलिसांना कुलूप फेकून मारले अन् अटकेच्या भीतीने थेट ...

नाशिक : घरफोडी करण्यासाठी घरात शिरलेल्या सराईत चोराने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच त्याने हातातील कुलूप पोलिसांच्या दिशेने फेकून मारले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न करताना स्वतःच्याच चाकूने हात आणि मानेवर वार करून घेतले. गोविंदनगरमधील पाईनवूड अपार्टमेंटमध्ये १२ नोव्हेंबर रोजी पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी गोरखसिंग गागासिंग टाक (४०, रा. हडपसर, पुणे) याला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे.

कुलूप तोडून घरात प्रवेश, पोलिसांना पाहताच पळापळ

१२ नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास गोरखसिंग टाक याने गोविंदनगर येथील पाईनवूड अपार्टमेंटमधील रूम क्रमांक सातचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. याची माहिती डायल ११२ वरून पोलिसांना मिळाली. त्यानुसार हवालदार शिवाजी वाघूजी शिरसाठ आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याचे लक्षात येताच टाक याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. हवालदार शिरसाठ यांनी त्याला पकडण्यासाठी पुढाकार घेतला असता, आरोपीने हातातील कुलूप त्यांच्या अंगावर फेकले. यात शिरसाठ जखमी झाले. मात्र, पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवले.

पकडले जाताच स्वतःवरच चाकूने वार

पोलिसांच्या ताब्यात सापडल्यानंतर आरोपीने स्वतःजवळील चाकूने दोन्ही हातांवर आणि मानेवर वार केले. अटकेची कारवाई टाळण्यासाठी त्याने स्वतःला जखमी केल्याचे पोलिसांच्या माहितीतून समोर आले आहे. स्वतःलाच जखमी करून पोलिसांना गोंधळात टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता.

४३ हून अधिक गुन्ह्यांची नोंद

गोरखसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात घरफोडी आणि चोरीचे ४३ हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये राका कॉलनीतील माजी नगरसेविका डॉ. ममता पाटील यांच्या घरात झालेल्या घरफोडीप्रकरणी टाकसह तिघांना अटक करण्यात आली होती. या घटनेत सुमारे एक किलो सोन्याचे दागिने आणि परकीय चलन चोरीला गेले होते.

टाक हा पुण्यातील हडपसरचा रहिवासी असून, त्याची बहीण नाशिकच्या गंजमाळ परिसरात राहते. तो तिच्याकडे मुक्काम करून नाशिकमध्ये चोरी आणि घरफोडी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचा साथीदार अमनसिंग टाक याच्याविरोधातही पंचवटी, सायखेडा आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांत चोरीचे चारहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी हवालदार शिवाजी शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५(अ), १३२, २२६ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेणी उपनिरीक्षक रोहिदास सोनार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >