
दिसपूर : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढून 26 वर पोहोचली आहे. मिनी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेली समोरासमोरची धडक इतकी भीषण होती की, अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. शनिवारी सकाळी जोरहाट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका तरुणीचा मृत्यू झाला. तिची ओळख लक्ष्मी माझी अशी पटली आहे. या दुर्घटनेमुळे आसाममध्ये शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
26 पैकी 23 जणांची ओळख पटली
प्राप्त माहितीनुसार, या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या 26 जणांपैकी आतापर्यंत 23 जणांची अधिकृत ओळख पटली आहे. मृतांमध्ये दीपांजली रंगफारपी, ज्योती माझी, अनुराग गोवाला, दामिनी घटोवाल, बेबी कर्मकार, दर्पना माझी, सुभाष दास, चालक अब्दुल माजिद, पूर्णिमा गोवाला, अब्दुल रशीद अली, फैजुल इस्लाम, फरहाना यास्मिन, सुनील भूमिज, हाइजुल इस्लाम, रंजिता घटोवाल, मुहम्मद रफिक, गंगा गोवाला, मुहम्मद अली, फारूक अहमद, गोलापी बेगम, मीना मिराज, दीपक गुरुंग आणि शनिवारी सकाळी मृत्यू झालेल्या लक्ष्मी माझी यांचा समावेश आहे.
आसाम : आसाममधील काझीरंगा परिसरात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. रोंगाजान भागात प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर गाडी आणि कंटेनर ट्रक यांच्यात जोरदार ...
रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी हा अपघात घडला. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू घटनास्थळी आणि गोलाघाट जिल्ह्यातील कहरा रुग्णालयात शुक्रवारीच झाला होता. त्यानंतर जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत 2 जणांचा, तर शनिवारी सकाळी एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जेएमसीएचमध्ये अनेक गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. सुमारे 20 जखमींना या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी स्वतः लक्ष ठेवून असून, प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 23 जणांचे मृतदेह गोलाघाट जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. गुवाहाटीहून आलेल्या विशेष डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.
रस्ते सुरक्षेवरून नागरिकांचा संताप
या भीषण अपघातानंतर विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग सर्वसामान्य नागरिकांकडून विविध ठिकाणी टोल वसूल करतो; मात्र रस्त्यांची दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. या दुर्घटनेमुळे आसाममध्ये शोककळा पसरली असून, रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






