
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील रिक्त १५५ कोतवाल पदांसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे परीक्षा स्थगित
नाशिक जिल्ह्यातील १५५ रिक्त महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना nashik.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, राज्य शासनाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार काही भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२६ पासून संबंधित शासन निर्णय जारी होईपर्यंत ज्या पदभरतींच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत; मात्र निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पूर्ण झालेला नाही, अशा भरती प्रक्रियांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचे नमूद करण्यात आले आहे.
नाशिक : घरफोडी करण्यासाठी घरात शिरलेल्या सराईत चोराने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच ...
कोतवाल भरतीला वयोमर्यादेची सवलत लागू होणार का ?
शासनाच्या नव्या निर्णयातील वयोमर्यादेची सवलत महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीला लागू होते की नाही, याबाबत संबंधित विभागाकडून मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. या संदर्भात स्पष्टता येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश महसूल विभागाने दिले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता १७ जानेवारी २०२७ रोजी परीक्षा
शासनाच्या सुधारित वेळापत्रकानुसार कोतवाल पदभरतीची परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सुधारित तारखेनुसार नियोजन करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. परीक्षेच्या तारखेसह इतर महत्त्वाच्या माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचेही त्यांनी सांगितले आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाचे :
- भरती : महसूल सेवक (कोतवाल)
- एकूण रिक्त पदे : १५५
- जुनी परीक्षा तारीख : १५ नोव्हेंबर २०२६
- नवीन परीक्षा तारीख : १७ जानेवारी २०२७
- अधिकृत संकेतस्थळ : nashik.kotwal.org





